पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


असलीहि आकांक्षा तेथे राहणार नाही. फार काय पण सत्य वस्तूच्या शोधांत आयण होतो हेहि स्मरण तुम्हांस राहणार नाही. इतके झाले म्हणजे गोपींच्या निष्काम प्रेमाचा प्रचंड ओघ तुम्हांला अंतर्बाह्य भरून टाकील. मानवी जीवि ताचा अंतिम हेतु हाच आहे. हे साधले म्हणजे सर्व काही साधेल.
 आतां कृष्णचरितांतील याहून अलीकडच्या पायरीचा विचार करूं. हा गीताकथन करणारा कृष्ण होय. गीते संबंधी विचार मनांत आला, म्हणजे आमच्या देशांत या बाबींत चालत असलेल्या विलक्षण तंट्याची आठवण झाल्यावांचून रहात नाही. हे तंटे अर्वाचीन काळीच सुरू झाले आहेत. गोपीजनवल्लभ श्रीकृष्ण ही व्यक्ति आमच्यांतील काही पंडितंमन्यांस आव डत नाहींशी दिसते; आणि याचे कारण हेच की, युरोपियन पंडितांस ती आवडत नाही. डाक्टर अमुकतमुक यांच्या पसंतीस ती उतरत नाही. बस; त्या गोपींनी आणि त्या श्रीकृष्णाने निजधामास गेलेच पाहिजे. अहो युरो पीय पंडितांच्या परवानगीशिवाय कृष्ण जगू तरी शकेल काय? छे, ही गोष्ट कधीच शक्य नाही. याकरिता असा गोपीजनवल्लभ कृष्ण कधी अस्तित्वांतच नव्हता असा पुरावा मिळविला पाहिजे. महाभारतांत एकदोन स्थळांशिवाय गोपींचा उल्लेख कोठेहि नाही; आणि ती स्थळेहि महत्वाची आहेत असें नाही. द्रौपदीने केलेल्या श्रीकृष्णस्तुतींत वृदावनांतील कृष्णचरित्राचा उल्लेख आहे; त्याचप्रमाणे शिशुपाळाच्या एका भाषणांतहि वृंदावनाचा उल्लेख आहे. पण तसे असले म्हणून काय झाले ? ही स्थळे क्षेपक आहेत असे म्हणावें. युरोपियांना जे आवडत नाही ते अर्थातच त्याज्य असल्यामुळे फेकून देणें अवश्य आहे. याकरता जेथे जेथें गोपी आणि श्रीकृष्ण असे उल्लेख आढळतील ती स्थळे क्षेपकच असली पाहिजेत. ठीक आहे. जी माणसें शुद्ध वाणिज्यांत डोक्याच्या वर बुडून गेली आहेत, आणि ज्यांची धर्मसाधने आणि साध्यहि शुद्ध दुकानदारीच्या प्रकाराची झाली आहेत, त्यांनी असा प्रकार करावा यांत नवल नाही. येथे काही धर्मसाधन करावयाचें तें पुढे स्वर्गसुख मिळावे म्हणून. या बाणगटांना आपले भांडवल चक्रवाढ व्याजांत गुंतविण्याची इच्छा आहे. येथे एक पैसा दिला म्हणजे स्वर्गात एक रुपया मिळेल, या हिशेबाने आपली सर्व कामें हे करीत असतात. असल्या प्रका

रच्या विचारसरणीत गोपीना स्थान मिळू नये हे सर्वथैव योग्य आहे !