पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवमः


असतांना गोपींच्या प्रेमाची मीमांसा करून त्याचे रहस्य जाणण्याची इच्छा करणे हे शुद्ध वेडेपण आहे. असे करण्याची छाती तरी आम्हांस कशी होते, याचेच मला मोठे नवल वाटते. कृष्णावताराचें सारें रहस्य या एकाच कथेत सांठविलेले आहे. सा-या अवतारकार्याचा अर्क येथे उतरला आहे. फार काय, पण तत्त्वमंदिरावर कळसाच्या जागी शोभणारी जी गीता तीहि गोपीप्रेमाच्या आवेशापुढे फिकी पडते. मानवी जीविताचें अंतिम साध्य दाखवून त्याकडे हळू हळू प्रवास कसा करावा हे गीतेने सांगितले आहे. हा सारा मार्ग लांब पल्लयाचा आणि कंटाळवाणा आहे. भक्तिरसाचे आकंठ पान करून त्याच्या धुंदीत साऱ्या विश्वाला तुच्छ लेखणारा आदेश गीतेत नाही. ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य, अध्ययन आणि अध्यापन, ग्रंथ आणि तत्त्वविचार, ही सारी एकरूप होऊन दुजेपणाचे भानहि जेथें उरत नाही, असलें भक्तिरसाने उत्पन्न होणारे शुद्ध वेड गीतेंत कोठे आहे ? ज्या ठिकाणी परमेश्वराचे अस्तित्वहि लय पावतें, ज्या ठिकाणी स्वर्ग आणि वैकुंठ असल्या कल्पनां चाहि उदय होत नाही, अथवा ज्या ठिकाणी भीति, हर्षविषादादि ऐहिक भावनांचा पुसटहि वास नसतो, असली धुंदी गीतेंत कोठे आहे ? येथे सर्व दुजेपणाचा पूर्ण लय झाला आहे, आणि जे काही उरलें तें शुद्धप्रेमाचे वेड. या ठिकाणी कृष्णावांचून दुसऱ्या कशाचेंहि भान त्याच्या भक्ताला होत नाही. तो जिकडे पाहील तिकडे एक कृष्णच त्याला दिसत असतो. बाह्य जगांत काय, अथवा अंतःसृष्टीच्या अगदी अतर्मदिरांत काय, कृष्णरूपावांचून दुसरा कशाचाहि प्रत्यय त्याला येत नाही. अखिल सृष्टीला तो कृष्णरूपाने पहातो, आणि स्वतःचे मुखहि त्याला कृष्णस्वरूप दिसते. त्याचा जीवात्माहि शुद्ध कृष्णमय होऊन गेलेला असतो. कृष्णचरिताच्या या भागांत सांठविलेलें. रहस्य हेच आहे.
 कृष्णचरिताचा अभ्यास ज्याला करावयाचा असेल, त्याने बारीकसारीक तपशीलाच्या नादी लागू नये. केवळ ठोकळ दृष्टीने या चरित्राचा जेवढा सांगाडा दिसेल तोच हिशेबी घेऊन त्यांतील खरें रहस्य कोठे आहे एवढाच शोध करावा. केवळ ऐतिहासिक दृष्टया यांत पुष्कळ विषम गोष्टी आढळून येतील, कित्येक ठिकाणी परस्परविरोधहि दिसेल, कित्येक ठिकाणी एखाद्या अनधिकाऱ्याने घुसडून दिलेल्या गोष्टींची खिचडी झाली असेल. या साऱ्या