पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


मारली म्हणजे तिची तिलाच भीति वाटून ती येथे थबकून उभी रहाते. हा प्रश्न आजकालचा नसून त्याची चर्चा फार प्राचीन काळापासून चालत आल्याचे आपल्या निदर्शनास येतें. ब्रह्मसूत्रांत ही चर्चा आहे. अरण्यवासांत असतां द्रौपदी आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये हीच चर्चा झाली होती. अत्यंत दयामय आणि सर्वशक्तिमान् असा व्यक्त परमेश्वर खरोखर अस्तित्वांत असेल तर पृथ्वीवर ही नरकाची उत्पत्ति का होते? अशी विचित्र सृष्टि त्याने का निर्माण केली ? असा परमेश्वर न्यायी नसून पक्षपाती म्हटला पाहिजे. या प्रश्नावलीला चोख उत्तर आपणांस देता येत नाही. त्याला एकच उत्तर गोपींच्या प्रेमाने दिले आहे. भगवान् श्रीकृष्णाच्या मागे कोणतेंहि विशेषण लावलेलें गोपींना खपलें नाही. फार काय, पण हे सारे विश्व त्याने निर्माण केले की नाही, हा प्रश्नसुद्धा त्यांच्या चित्तांत आला नाही. तो सर्वशक्ति- मान् आहे की अगदी दुबळा आहे, असली चर्चा त्यांनी कधी केली नाही. तो अनंत प्रेमस्वरूप आहे एवढे मात्र त्यांना ठाऊक होते. याखेरीज दुसरें कोण णतेंहि स्वरूप त्यांना ठाऊक नव्हते आणि ते माहित व्हावें अशी अपेक्षा हि त्यांनी केली नाही. कृष्ण म्हणजे वृंदावनांतला प्रेममय कृष्ण, ही एकच व्याख्या त्यांना ठाऊक होती. तो दुष्टांचे दमन करणारा आणि राजांचा राजा त्यांच्या दृष्टीने केवळ गोप होता, आणि अखेरपर्यंत त्यांना तो गोपच रा हिला. 'मला धन नको, आप्तसोयरे नकोत, मला विद्येची गरज नाही, मला स्वर्गसुख नको, अथवा मुक्तिहि नको. फक्त तुझी भक्ति माझ्या चित्तांत दृढ असावी आणि तीहि अत्यंत निर्व्याज असावी,' इतकेंच त्यांचे मागणे होते. धर्माच्या इतिहासांत हे एक मोठे ध्वजेचे स्थल आहे. नि व्याज प्रेम हे या स्थानाचे मुख्य स्वरूप आहे. यांतूनच पुढे निर्व्याज कर्म उत्पन्न झाले; आणि अनासक्त चित्ताने कर्म करावे हा सिद्धांत भगवान् श्रीकृष्णांनीच प्रथम बोलून दाखविला आहे. हिंदुस्थानच्या भूमीवर मानवजातीच्या इति हासांत हे तत्त्व अशा रीतीने प्रथम उदयास आले. भीतीची भक्ति आणि व्यापारी भक्ति यांचा निःपात झाला; नरकाची भीति उडाली आणि स्वर्ग सुखाची आकांक्षा नाहीशी झाली; आणि त्याची जागा निर्व्याज प्रेम आणि अनासक्त कर्म या दोन अत्युच्च तत्त्वांनी बळकाविली.
 आणि या प्रेमाचे स्वरूप तरी कसें आहे पहा. गोपीचें प्रेम आपणास सम जावयाचे नाही, हे मी नुकतेच तुम्हास सांगितले आहे. या दिव्य प्रेमाचा