पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


बसली आहे. मनुष्यांनीच काय, पण देवदेवतांनीही तिचे पूजन करावे, अशी तिची योग्यता आहे. अशी स्त्री साऱ्या आर्यावर्ताचें आधिदैवत होऊन बसली यांत नवल काय ? सीतेचे चरित्र हिंदुस्थानांतील आबालवृद्धांच्या मुखी असते. सर्व पुराणे उद्या काळाच्या पोटांत गेली, शृती लोपल्या, संस्कृत भाषाहि नष्ट झाली, आणि पांच हिंदु शिल्लक राहिले तथापि त्यांच्या मुखांतून सीतेचे चरित्र ऐकावयास मिळेल. सीता सा-या आर्यवंशाच्या रोम रोमांत भिनून राहिली आहे, हे माझे शब्द तुम्हीं पक्के ध्यानात ठेवा. आमच्या स्त्रियांना सुधारण्याचा आणि त्यांना अर्वाचीन बनविण्याचा यत्न तुम्हीं कि तीहि केला, तरी सीतेचा आदर्श सोडून त्यापलीकडे एक पाऊलही त्या सर कावयाच्या नाहीत. तुमचा उद्योग या दृष्टीने सुरू आहे अशी नुसती शंका त्यांना आली, तरी त्याक्षणीच तुमचे सारे यत्न ढांसळून पडतील. हा अनुभव आजपर्यंत शेकडों वेळां आम्हांस प्रत्यक्ष आला आहे. सीतेच्या पावलांमागें पावले टाकूनच आपला मार्ग हिंदु स्त्रीजाती आक्रमील; आणि असे होणे हे योग्यहि आहे.
 यानंतर हिंदुस्थानांत आबाल वृद्धांस पूजनीय असा दुसरा अवतार झाला. अनेक रूपांनी या अवताराचे पूजन स्त्रिया आणि पुरुष करीत असतात. या दोघांनाहि तो सारखाच पूज्य आहे. तो बालकांचा जसा आवडता तसाच वृद्धां- नाही तो प्रिय आहे. याच्या संबंधी बोलतांना या अवतारांत परमेश्वर पूर्ण त्वाने अवतरला असे उद्गार भगवान् व्यासांनी काढिले आहेत. त्यांच्या दृष्टीने इतर अवतार परमेश्वराचे केवळ अंशरूप असून श्रीकृष्ण मात्र पूर्णा वतार होत. भगवान् श्रीकृष्णाच्या चरित्राचा विचार केला म्हणजे या व्या सोक्तीबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान् श्रीकृष्ण संन्याशांत संन्यासी होते आणि त्याबरोबरच गृहस्थाश्रम्यांत गृहस्थाश्रमी होते. त्यांचा संन्यास जसा पूर्ण, तसाच गृहस्थाश्रमहि पूर्णत्वास पावलेला होता. त्यांच्या अंगी अतुल शक्ति होती; तथापि ह्या स्थितीतहि ते पूर्ण विरागी होते. गीताशास्त्र उत्तम समजल्याशिवाय भगवान् श्रीकृष्ण यांच्या चारित्र्याचे रहस्य तुमच्या ध्यानी यावयाचे नाही. गीतेंत त्यांनी स्वतःच जी तत्त्वे सांगितली, त्यांचे मूर्तिमंत रूप त्यांच्याच ठिकाणी व्यक्तदशेला आले होते. सारे अव तारी पुरुष अशाच स्वरूपाचे होते. जे तत्त्व तोंडाने उच्चारावयाचें तेंच