पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२०७


कर्तव्य आहे. याच स्थितीला मुक्ति असें नांव आमच्या शास्त्रांनी दिले आहे. अमुक ग्रंथावर अथवा वचनावर माझा विश्वास आहे असे म्हटल्याने ही स्थिति प्राप्त होत नाही; त्याचप्रमाणे हजारों यात्रा करून आणि हजारों देवतांची दर्शने करूनहि ही स्थिति प्राप्त होणार नाही. जगांतील सा-या नद्यांत कितीहि बुचकळ्या तुम्ही मारल्या, तरी तुम्हांस मुक्तिलाभ व्हावयाचा नाही. हा लाभ तुम्हांस करून घ्यावयाचा असेल तर तुम्ही मंत्रद्रष्टा बनले पाहिजे.
 शृतिकाल सोडून आपण जरा अलीकडे आलों म्हणजे अवतारी पुरुषांचें दर्शन आपणांस होतें. सारे जग हालविण्यासारखें सामर्थ्य यांच्या अंगीं होतें. असे अवतारी पुरुष अनेक होऊन गेले असें भागवतांत सांगितले आहे. तथापि या अनेक पुरुषांपैकी राम आणि कृष्ण या दोहोंचेंच पूजन हिंदुस्था नांत होते. सत्य आणि नीति यांचा मूर्तिमंत पुतळा राम हा होता. पुत्र, भर्ता, भ्राता, राजा इत्यादि अनेक नात्यांनी रामाचे स्वरूप आदर्शवत् आहे. या रामावताराचें चरित्र महाकवि आणि मोठे ऋषिवर्य श्रीवाल्मीकि यांनी गाइलें आहे. यांच्या वाणीइतकी सुंदर, पवित्र आणि साधी वाणी दुसऱ्या कोठेहि आढळावयाची नाही. यांनी रामचरित्राबरोबरच सीतेचें चरित्रहि सां गितले आहे. हे चित्र या महाकवीने इतक्या बहारीच्या रंगांत रंगविलें आहे की, साऱ्या जगाचा काव्येतिहास तुम्ही पालथा घातला, तरी त्यांत दुसरी सीता तुम्हांस आढळावयाची नाही. सीता ही साऱ्या जगांत एकच. सीतेला तुलना सीतेचीच. ज्या काळी हे चरित्र घडून आले, त्यानंतर आजपर्यंत दुसरी सीता पुन्हां निर्माण झाली नाही. जे चरित्र एकदां रेखाटले गेलें तें आज- पर्यंत अखेरचेच राहिले आहे. कदाचित् राम आजपर्यंत पुष्कळ होऊन गेले असतील, पण सीता मात्र एकटीच. सीता ही हिंदु स्त्रियांचा आदर्श आहे. स्त्री कशी असावी, या प्रश्नाचे उत्तर 'सीतेसारखी' या एकाच शब्दांत भरतभूमीनें कायमचे देऊन ठेविलें आहे; आणि आज हजारों वर्षे हा आदर्श आम्हांपुढे अबाधित राहिला असून अखिल आर्यावर्तातील कोट्यवधि स्त्रीपुरुषांचे आणि मुलांचे प्रणाम तो घेत आहे. प्रत्यक्ष पावित्र्याहून पवित्र असा हा आदर्श काळाच्या अंतापर्यंत असाच कायम रहावयाचा आहे. सान्या आयुष्यभर सीतेने दुःख मात्र भोगिलें, पण त्याविरुद्ध कधी चकारशब्दहि मुखावाटे का ढला नाही. अशी ही पावित्र्याची मूर्ति सर्व जनतेची पूज्य देवी होऊन