पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०४स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


मनाचे खरे स्वरूप अल्पस्वल्प अंशाने आपल्या प्रत्ययास येत असते; आणि त्यांतून पलीकडचे अनंतरूप अल्पांशाने आपणांस दिसत असते. या ठिकाणी शब्द पोंचूं शकत नाहीं; आणि तेथे मनहि जाऊं शकत नाही. अशा गोष्टी आपल्या सामान्य जीवनक्रमांत पुष्कळ वेळां घडत असतात. हाच अनुभव वारंवार यावा, तो दीर्घकाल रहावा आणि अखेरीस तो पूर्णत्वास पावावा हाच आपला अभ्यास आणि हेच आपले अखेरचे साध्य. जीवात्मा इंद्रियांनी बद्ध नाही, ही गोष्ट फार प्राचीन काळी मनुष्याच्या लक्षात आली. फार काय, पण तो जाणिवेनेंहि बद्ध नाही असे त्यास कळून आले. अनंत शृंखलेत जा णीव हा एक दुवा आहे, ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे. अस्तित्व आणि जाणीव ही एकरूप नाहीत. जाणिव हा अस्तित्वाचा एक भाग मात्र आहे. जाणिवेपलीकडे उडी मारण्याचे धैर्य ज्यांना असते तेच अनंतापर्यंत पोहोंचूं शकतात. जाणीव इंद्रियांनी बद्ध आहे. तिचे वास्तव्य इंद्रियांच्या मर्यादेत आहे. आपणांस इंद्रियांपलीकडे आणि जाणिवेपलिकडे गेले पाहिजे. तसे झाले तरच सत्यवस्तूची भेट आपणांस होईल. इंद्रियांपलीकडे गेलेली माणसे आजमितीस आहेत. यांनाच सत्यवस्तु ठाऊक असते; आणि याच सत्यद्रष्टयांना ऋषि असें म्हणतात.
 आपल्या सामान्य दृष्टीला आजूबाजूच्या वस्तू जशा दिसतात, त्याचप्रमाणे शृतींना सत्यवस्तु दिसली. सामान्य वस्तूंच्या अस्तित्वाबद्दल आपले डोळे जसे प्रमाण आहेत त्याचप्रमाणे सत्यवस्तूविषयीं वेदप्रामाण्य आहे. याला प्रत्यक्ष प्रमाण असें म्हणतात. जी गोष्ट आपण डोळ्यांनी पाहृतों, तिच्या अस्तित्वाबद्दल दुसऱ्या कसल्याहि प्रमाणाची अपेक्षा आपण करीत नाही. त्या चप्रमाणे वेदांनाहि सत्यवस्तु प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध असते. माझ्या समोरील हे मेज मी माझ्या बाह्य इंद्रियांनी पहातों; त्याचप्रमाणे चैतन्य वस्तूचे अ स्तित्व जाणिवेपलीकडे गेल्यानंतर मला प्रत्यक्ष दिसू लागेल. अशी स्थिति अमुक एकाला प्राप्त करून घेता येते, अथवा ती अमुक स्थली आणि अमुक काली प्राप्त होते असे नाही. ती प्राप्त करून घेण्याच्या मार्गात जात अथवा वय ही आड येत नाहीत. आर्याला, अनार्याला, म्लेंच्छालाहि आणि दुसऱ्या कोणालाहि हीच स्थिति प्राप्त करून घेता येण्यासारखी आहे, असें वात्स्या यनांनी ठासून सांगितले आहे. वेदांतील ऋषित्व तें हेच; आणि हिंदु धर्माचें