पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते २०१


जनापैकी बहुतेकांच्या अंगी नाहीं; आणि यासाठी कोणातरी मार्गदर्शक म्होर क्याची आवश्यकता त्यांना आहे, ही गोष्ट अत्यंत प्राचीन काळीही आमच्या ऋषिवर्गाच्या ध्यानी आली होती. परमेश्वर म्हणून कोणातरी पूज्य व्यक्तीची आवश्यकता सामान्य बुद्धीच्या लोकांस आहे, हे त्यांस कळलें होतें. खुद्द बुद्धानें परमेश्वराचे अस्तित्व मानले नाही. परमेश्वर म्हणून काही विशिष्ट रूपाचे व्यक्तित्व अस्तित्वात नाही असे त्याने ठासून सांगितले. पण त्याच्या मृत्यूनंतर ५० वर्षांच्या अवधींत त्याच्या शिष्यांनीच एक व्यक्तिविशिष्ट पर मेश्वर निर्माण केला. बुद्धालाच ते परमेश्वर म्हणूं लागले. यावरून कांहीं गुण विशिष्ट परमेश्वराचे अस्तित्व आवश्यक आहे हे उघड दिसून येते. अशा स्थितीत काहीतरी काल्पनिक गुण एकत्र करून त्यांच्या मुशीतून एकादा काल्पनिक परमेश्वर निर्माण करण्यापेक्षा जगांत जे लोकोत्तर पुरुष झाले, ज्यांनी सामान्य मनुष्यांत प्रत्यक्ष व्यवहार केला आणि ज्यांचे अस्तित्व सामान्य जनांनी नजरेने पाहिले, अशाच व्यक्तीला परमेश्वराच्या ठिकाणी मानणे अधिक युक्त नाहीं काय ? काल्पनिक गुणांनी उत्पन्न केलेली परमेश्वराची काल्पनिक स्वरूपं बहुधा नव्याण्णव हिश्यांनी इतक्या गलिच्छ स्वरूपाची असतात की, त्यांचे पूजन करणे ही गोष्ट आपल्या माणुसकीला लांच्छन आणते. आपल्या कल्प नांनी उत्पन्न केलेल्या कितीही उत्कृष्ट परमेश्वराच्या स्वरूपापेक्षा हे अवतारी पुरुष आणि महात्मे आपली पूजा घेण्यास अधिक पात्र होतात. तुमच्या आमच्या कल्पना कितीही विशाल झाल्या तरी त्यांतून निर्माण झालेल्या पर मेश्वराच्या स्वरूपापेक्षां भगवान् श्रीकृष्ण कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहेत. आपल्या मनांत उत्पन्न झालेल्या पवित्रतम मूर्तीपेक्षा भगवान् बुद्धांची मूर्ति निःसंशय अधिक उच्च आहे; आणि यामुळेच हे पुरुष मानवजातीच्या दृष्टीने आज दीर्घकाळ पूजार्ह होऊन बसले आहेत. परमेश्वराच्या काल्पनिक मूर्ती सही या जिवंत अवतारांनी मागे टाकले आहे. मनुष्याची ही प्रवृत्ति आमच्या ऋषिवर्यांस माहीत असल्यामुळे संतांचे आणि अवतारी पुरुषांचे पूजन कर ण्याचीमुभा सर्व लोकांस त्यांनी देऊन ठेविली होती. फार काय पण भगवान् श्रीकृष्ण याच्याही पुढे जाऊन म्हणतात, “यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जित- मेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ॥" ज्या ठिकाणी कांहीं लोकोत्तर गुण स्पष्टत्वास आला असेल, त्या ठिकाणी परमेश्वर अवतरला