पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.१९५


ही गरज आहेच, पण सुशिक्षितांना ती त्याच्याहून अधिक आहे ! कारण, आमच्या अर्वाचीन शिक्षणपद्धतीने सुशिक्षितांच्या अंगी जी ज्ञानाची सूज येते तिचे स्वरूप फारच भयंकर आहे ! आज प्रकाशाची जरूर सर्वत्र भासत आहे. याकरिता ती भागविण्याचा यत्न तुमच्याने होईल तितका करा आणि मग बाकीचे कार्य भगवंताच्या मर्जीवर सोपवा. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' हे त्याच भगवंतानें तुम्हांस सांगितले आहे. स्वतःसाठी म्हणून कांहीं कर्म आरंभू नका. अथवा अमुक कर्म शेवटास नेऊन त्याचें फळ मी भोगीन हेही म्हणूं नका; तथापि सदोदित कर्मरत मात्र रहा. एक क्षणही रिकामा घालवूं नका.
 आमच्या पूर्वजांना अत्यंत प्राचीनकाळी हा अमूल्य ज्ञानाचा ठेवा ज्याने दिला तोच भगवान् आपल्या आज्ञांच्या पूर्तीस लागणारे सामर्थ्य तुम्हांस देतो.


***********