पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] कैवल्याचा मार्ग. १५

मात्र खचित होईल असे वाटून नाचिकेताने स्वतःचे दान करण्याचा निश्चय केला. आपल्या बापाकडे जाऊन तो म्हणाला "बाबा, माझें दान तुम्ही कोणाला करतां ?" मुलाच्या या प्रश्नाला बापानें कांहीं जबाब दिला नाहीं; तेव्हां नाचिकेताने तोच प्रश्न पुनःपुन्हां आपल्या बापाला विचारला. मुलाच्या या कृतीची चीड येऊन तो गृहस्थ म्हणाला, "तुझें दान मी यमाला देतो. तुला मृत्यूच्या स्वाधीन करतो." बापाची आज्ञा ऐकून नाचिकेत एकदम यमलोकाला गेला. त्या वेळी यमराजाची स्वारी घरी नव्हती. तेव्हां त्याची वाट पाहात नाचिकेत तेथेच बसला. तीन दिवसांनंतर यम परत आला आणि त्याला म्हणाला, ब्राम्हणपुत्रा, तूं माझा अतिथि असून तीन दिवस येथे उपाशी बसून राहिला आहेस, याचे मला फार वाईट वाटते. तुला मी नमन करतो आणि तुला व्यर्थ श्रम दिले त्याचा मोबदला म्हणून तीन वर मी तुला देतो. नाचिकेत म्हणाला, "यमधर्मा, तुझ्या पहिल्या वराने माझ्या पित्याचा मजवरील क्रोध शांत होवो.” दुसरा वर म्हणून काही विशिष्ट यज्ञाच्या क्रिया त्याने यमाला विचारल्या. तिसरा वर मागतांना नाचिकेत म्हणाला, “ मनुष्य मृत्यु पावला म्हणजे तो कोणत्या अवस्थेस जातो ? कोणी असे म्हणतात की तो सर्वथा नाश पावतो. दुसरे कित्येक म्हणतात की त्याला अस्तित्व असतें. यांत खरें काय आहे ? या प्रश्नाचे उत्तर मला आपण द्यावें अशी याचना तिसऱ्या वराने मी करतो." नाचिकेताचे हे भाषण ऐकून यमधर्म म्हणाला “या कोड्याचे उत्तर मिळविण्याचा यत्न देवांनीही प्राचीनकाळी एकदां केला होता, तथापि त्यांनाही त्याचे उत्तर मिळाले नाही. हा प्रश्न इतका बिकट आणि नाजुक आहे की त्याचे उत्तर मिळणे मोठे दुरापास्त आहे. याकरितां या गोष्टीच्या नादी न पडतां दुसरा एखादा वर तूं माग. शतवर्षांचे आयुष्यही माग.हवे तेवढे गोधन अथवा राज्यही तूं मागितलेस तरी तेंसुद्धा मी तुला देईन;पण तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मात्र मजकडून तूं मागू नको. मनुष्याला ज्या गोष्टी सुखाच्या म्हणून वाटतात, त्या साऱ्या तूं मागितल्यास तरी तितक्या सर्व मी तुला देईन; पण या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह तूं मला करूं नको.” यमराजाचे हे भाषण ऐकून नाचिकेत म्हणाला, “ यमराज, संपत्ति कितीही मोठी झाली तरी तिनें मनुष्याची तृप्ति होणार नाही. आपली मर्जी आहे तर वाटेल तितकी संपत्ति अथवा दीर्घायुष्य ही मला मिळणे कठीण