पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


शकूं ही कल्पनाच खोटी आहे. फार झाले तर आपण कोणाची सेवा करूं शकूं. परमेश्वराच्या लेकरांची सेवा तुम्ही करा; अथवा तितका हक्क तुम्हांला प्राप्त झाला असेल तर प्रत्यक्ष परमेश्वराचीच सेवा करा. आपल्या एखाद्या लेंक राच्या उपयोगी तुम्हीं पडावें एवढी कृपा त्याने तुम्हांवर केली असेल, तर तुमचे जीवित सार्थ होय ! तुम्ही धन्य आहां, पुण्यवान् अहां असें म्हटले पाहिजे. स्वतःच्या बडेजावकीच्या खोट्या कल्पनांनी व्यर्थ फुगून जाऊं नका. सामान्य माणसांस प्राप्त न होणारा सेवेचा हक्क तुम्हांस मोठ्या भाग्याने प्राप्त झाला आहे. याकरितां या हक्काचा उपयोग करून परमेश्वराचे पूजनही त्याचद्वारे तुम्ही साधाल. वस्तुमात्राच्या ठिकाणी परमात्मरूप मी पाहावें आणि त्याचे पूजन करावें हा मुक्ति मिळविण्याचा सोपा मार्ग होय. जगां तील दरिद्री आणि दुःखी कष्टी लोक आमच्या मुक्तीकरितांच आहेत. भग वंताचे पूजन आम्हांस करता यावे म्हणून तोच रोगग्रस्तांच्या रूपानें, वेड्या पिशांच्या रूपाने, रक्तपित्यांच्या रूपाने आणि भयंकर पातक्यांच्या रूपानेही अवतार घेतो! माझे हे शब्द तुम्हांस धाष्टयीचे वाटत असतील, पण पुनः पुन्हां मी हेच म्हणतो की, अवघे विश्व परमात्मरूप दिसू लागणे ही आपल्या जीवनसौख्याची परमावधि होय. विश्वांतील या विविधरूपांनी परमेश्वर नटला आहे असें दिसलें म्हणजे दृश्यापलीकडे आपण जातो आणि मग पाहावयाचे असे काही उरतच नाही. दुसऱ्यांवर सत्ता चालवून आणि त्यांना मोठ्या बंदोबस्ताने आपल्या ताब्यात ठेवून त्यांचे कल्याण आपण करूं शकू ही कल्पना तुम्ही प्रथम टाकून द्या. एखाद्या झाडाला वाढीला लावावयाचे असलें तर त्याला खतपाणी घालणे आणि योग्य हवेच्या जागी त्याची यो- जना करणे इतकेच आपल्या हाती आहे. यांपैकी त्याला जरूर असतील त्या वस्तू घेऊन आणि त्या पचवून ते स्वभावतःच वाढू लागते. त्याची वाढ करणे तुमच्या हाती नसून फक्त अनुकूल परिस्थिति त्याला निर्माण करून देणे एवढेच तुम्ही करू शकता. हाच न्याय माणसांसही लागू आहे.
 जेवढा प्रकाश तुमच्याने जगांत आणवेल तेवढा आणा. या प्रकाशाची प्राप्ति प्रत्येकास करून द्या. अशी प्राप्ति प्रत्येकाला होईपर्यंत आपले कर्तव्य संपत नाही. या प्रकाशाची जरूर दरिद्र्याला आहे आणि श्रीमंतालाही आहे. किंबहुना, गरीबापेक्षा श्रीमंतालाच ही गरज अधिक आहे ! अज्ञ मनुष्याला