पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

चिंतन तुमच्या रक्तमांसांत खेळू द्या. मी मर्त्य आहे, मी दुर्बल आहे मी दुःखी आहे, मी पापी आहे अशा प्रकारचा आभास उत्पन्न करणारी सारी स्वप्ने पूर्ण विलयास जाईपर्यंत हे चिंतन सोडूं नका. असें झालें म्हणजे सत्यवस्तु तुम्हांपासून क्षणभरही लपवून ठेवण्याचे सामर्थ्य कोणासही उरणार नाही.

कैवल्याचा मार्ग

 श्रुतींतील एक कथा आज तुम्हांस सांगण्याचा माझा विचार आहे. वैद हे हिंदूंचे धर्मग्रंथ असून विस्तृत साहित्य त्यांत सांठविले आहे. वेद ग्रंथांच्या अंतिम भागांना वेदान्त अशी संज्ञा आहे. वेदान्त म्हणजे वेदांची अखेर. ज्या तत्त्वज्ञानाचा विचार सध्या आपण करीत आहों त्याचीच चर्चा या भागांत विशेषेकरून केलेली आहे. हा भाग जुन्या संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. तो लिहून गेल्याला आज हजारों वर्षांचा काळ लोटून गेलेला आहे हे तुम्ही लक्ष्यांत आणा. एक महायज्ञ करावा अशी इच्छा कोणा एकास झाली. हिंदु धर्मांत यज्ञ हे एक फार मोठ्या महत्वाचे प्रकरण आहे. हिंदु धर्मग्रंथांत अनेक प्रकारचे याग सांगितले आहेत. स्थंडिलावर अग्नि करून त्यांत आहुती देतात, व अनेक प्रकारचे मंत्र ऋत्विज तोंडाने म्हणत असतात. यज्ञसमाप्तीच्या वेळी गोरगरिबांना व ब्राम्हणांना मोठा दानधर्म करतात. प्रत्येक यागाचें फळ वेगवेगळे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक यागाच्या क्रियाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एका प्रकारच्या यागांत आपल्या सर्वस्वाचे दान करावे लागते. आतां ज्या यज्ञाची गोष्ट मी सांगणार आहे त्यांतील यजमान मोठा संपत्तिमान् पण अत्यंत कद्रु होता; तथापि अशा प्रकारचा महायज्ञ केल्याची कीर्ति मात्र त्याला हवी होती. यज्ञसमाप्तीच्या वेळी सर्वस्व दान करण्याची पाळी आली तेव्हा आपणाजवळील वित्ताचे दान न करता त्याने आपली एक म्हातारी, आंधळी आणि लंगडी अशी एक गाय मात्र दिली. ही गाय अतिवृद्ध झालेली असल्यामुळे ती दूध देण्यासारखी नव्हती. या गृहस्थालानाचिकेत या नावाचा एक मुलगा होता. हा मुलगा वयाने लहान पण फार तरतरीत होता. आपल्या बापाने असली भिकार दाने दिल्यामुळे त्याची अपकीर्ति