पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


गास येतो. संसारांत काय किंवा परमार्थात काय, अज्ञान हेच आपल्या दुःखांचे मूळ आहे. केवळ अज्ञानामुळेच एकमेकांचा द्वेष आपण करीत असतो. दोघांच्याही अंगीं सारखंच अज्ञान असल्यामुळे, ते दोघे एकमेकांस जाणूं शकत नाहीत आणि यामुळेच त्या दोघांत प्रेमभाव वसत नाही. पर- स्परांची बरोबर ओळख झाली की तेथें प्रेम उत्पन्न होते, आणि असे होणे अपरिहार्यच आहे. आपण खरे वस्तुतः एकरूपच आहों. अज्ञानामुळे एक- मेकांची ओळख विसरल्याने प्रेमही नाहीसे झाले. पण ही ओळख पट- तांच प्रेमही उद्भवावें हे योग्यच होय. अशा रीतीने साऱ्या जगभर दळण- वळण वाढत जाऊन ही गेलेली ओळख पुन्हां पटू लागली आहे. एकीकडे राष्ट्राराष्ट्रांत तंटे सुरू असतां दुसरीकडे ही एकीकरणाची चळवळ अव्याहत सुरू आहे. राजकारण आणि सामाजिक बाबी यांचीही गोष्ट आज अशीच झाली आहे. जे प्रश्न पूर्वी एखाद्याच राष्ट्राच्या हिताहिताच्या दृष्टीने सोडवावयाचे असत, तेच प्रश्न आता आंतर्राष्ट्रीय होऊन बसले आहेत. एखाद्या राष्ट्रातील राजकारणाच्या बाबींची वासलात लावतांना इतर राष्ट्रे काय म्हणतील आणि आपल्या कृतीचा परिणाम इतर राष्ट्रांवर काय होईल, याचा विचार त्या रा ष्ट्राला आतां करावा लागतो. पूर्वीच्या प्रश्नांनी आपले एकदेशित्व सोडले असून ते आतां जगद्व्यपी होऊन बसले आहेत. जगांतील सर्व राष्ट्रांच्या सल्लयाशिवाय त्यांचा समाधानकारक निकाल लागणे मुष्किलीचे झाले आहे. सर्व राष्ट्रीय कायदे, सर्व राष्ट्रांची जूट, सर्व राष्ट्रांची संघटना या शब्दांचा उच्चार आतां जागोजाग होऊ लागला आहे. मनुष्यजाति वस्तुतः एकरूप आहे, हेच या साऱ्या चळवळीचे रहस्य आहे. भौतिक शास्त्रेही या वस्तुजा तासंबंधी अधिक उदार होत चालली आहेत. या साऱ्या विविधतेच्या पोटांत कोठेतरी एकतानता असावी असे त्यांस आतां वाढू लागले आहे. हे सारें विश्व म्हणजे एकच जड वस्तु असून तुम्ही, मी, चंद्र, सूर्य, तारे आणि बाकीचे सारे पदार्थ हे त्या एकाच प्रचंड जड वस्तूच्या लहान लहान विभागां- प्रमाणे आहों. या अफाट जड समुद्रावर तुम्ही आम्ही लहान लहान तरंगांसारखे चलनवलन करीत आहो. ही जड सृष्टि सोडून मानसिक सृष्टीकडे आपण वळलों तरी तेथें हाच प्रकार आहे. आपले विचार म्हणजे विश्वविचारसाग- रावरील तरंग होत. त्याचप्रमाणे आपली चैतन्यरूपें हीसुद्धा त्या आत्मसमु-