पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदु चरित्रकमांतील वेदान्ताचे स्वरूप. १८३


माझ्या या मतांबद्दल पाश्चात्त्य राष्ट्रातून टीकेचा भडिमार मजवर होत आहे. जगांत पाप नाही हे माझे मत सैतानी आहे असेही म्हणणारे लोक तिकडे पुष्कळ आहेत. ठीक आहे. पण निश्चयाने त्रिवार सांगतों की याच टीका- कारांचे वंशज मजवर स्तुतीचा वर्षाव करतील. मनुष्यप्राणी स्वभावतः पुण्य- मय आहे हे लोकांस पटविणे हेच माझें कार्य आहे. जगांत कोणीही पापी नाहीं, हाच संदेश मला जगाला सांगावयाचा आहे. अंधकाराच्या दूतापेक्षा प्रकाशाचा दूत म्हणवून घेण्यांत मला अधिक भूषण वाटते.
 हे विश्व बाह्यतः विस्कळित दिसत असले तरी त्याच्या अंतर्यामी पूर्ण एक- तानता आहे, आणि एकाच ग्रंथींत तें पक्के बांधले गेले आहे, हा आमचा दुसरा सिद्धांत पाश्चात्त्यांच्या गळी उतरवावयाचा आहे. परस्परांपासून परस्परांचे भिन्नत्व दाखविणाऱ्या जुन्या रेषा आतां अंधुक होत असून थोड्याच काळांत त्यांचा मागमूसही उरावयाचा नाही, अशी चिन्हें आतां स्पष्ट दिसत आहेत. वीज आणि वाफ ही साधनें दूरदूरच्या टोकांस आतां एकमेकांजवळ आणीत आहेत आणि यामुळे दूरदूरच्या देशांतील माणसांचे दळणवळण वाढत आहे. आपल्या देशाच्या हद्दीच्या बाहेर भुताखेतांची आणि समंधांची वस्ती नाही, हे आपणास आतां अनुभवाने कळू लागले आहे. तसेंच युरोपाबाहेर फक्त नरभक्षक लोक राहतात, हा युरोपीयांचा समजही अगदी खोटा आहे हे त्यांस कळू लागले आहे. आपला देश सोडून आपण परदेशांत प्रवेश केला म्हणजे तेथेही आपल्याचसारख्या आपल्या बांधवांचा वास आहे असें आप- णास आढळून येऊ लागते. आपणास मदत करावयास तेथे शेकडों हात पुढे सरतात. येथल्याप्रमाणेच तेथेही शेंकडों मुखें आपणांस आशीर्वाद देतात. फार काय पण आपल्या देशांत दृष्टीस पडावयाची नाहीत, अशी परोपकारी माणसें तेथें आपणास आढळतात. त्याचप्रमाणे परकी लोक येथे आले म्हणजे येथेही त्यांच्याच देशांतील बांधव त्यांना आढळतात. मनुष्यस्वभाव येथून तेथवर एकसारखाच आहे. मग कृत्रिम सरहद्दींनी त्याच्यांत फरक कसा पडणार?
 आपले अज्ञान हेच आपल्या साऱ्या दुःखांचे मूळ आहे असे आपली उपनिषदें म्हणतात; आणि ही गोष्ट सर्वथा खरी आहे असा अनुभवही आप.