पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


आहे. या साऱ्या गोष्टींची आठवण करून मी तुम्हांला पुनःपुन्हां हेच सांगतों की बाबांनो, अपार मनौदार्य मिळवा. तुमची उपनिषदें ही सामर्थ्याची खाण आहे. साऱ्या जगाला पुरून उरण्याइतका सामर्थ्याचा साठा उपनिषद्ग्ग्रंथात आहे. त्यांच्याद्वारे साऱ्या जगाला नवें चैतन्य आणता येईल. कोणत्याही पंथाचा, धर्माचा अथवा जातीचा कोणीही मनुष्य असो, आमच्या उपनि षदांची रणतुतारी वाजली की तो खडबडून जागा होईल. जागे व्हा, उठा- आणि मुक्त व्हा असा घोष उपनिषदें करीत आहेत. शारीरस्वातंत्र्य, मन: स्वातंत्र्य आणि चैतन्यस्वातंत्र्य हेच आमच्या उपनिषदांचे मुख्य बुरूज आहेत.
 जगांत अनेक धर्मशास्त्रे निर्माण झालेली आहेत; पण त्यांत पूर्ण मुक्तीचा मार्ग कोणीही दाखविला नाही. सलोपता, समीपता अथवा सरूपता यांपलीकडे कोणाचीही मजल गेली नाही. कैवल्य मुक्तीचा मार्ग उपनिषदांनी मात्र दाख- विला आहे. तरी यांचा आधार घेऊन सृष्टीने घातलेल्या हद्दीचे उल्लंघन तुम्ही खुशाल करा. आज अनेक प्रकारचे दौर्बल्य तुमच्या अंगी आहे, पण उपनि षदांच्या आधाराने तुम्ही चालला तर हे सारें दौर्बल्य नष्ट होईल, आणि आपण वास्तविक दुबळे कधीच नव्हतों असा अनुभव तुह्मांस येईल. आज तुम्ही द्वैती अहां हे उघड आहे. तथापि असे असले तरी त्याला आमची उपनिषदें हरकत घेत नाहीत.आत्मा स्वभावतःच परिपूर्ण आहे ही गोष्ट निःसंशय खरी असल्याचे आपण वारंवार सिद्ध केले आहे. स्वभावतः परिपूर्ण असलेला आत्मा कर्मानुसार आकुंचित होऊन राहिला आहे, या मतांत श्रीरामानुज आणि अर्वाचीन काळांतले उत्क्रांतिवादी यांचे विलक्षण साम्य आहे, ही गोष्ट विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. परिपूर्ण आत्म्याच्या शक्तीचे आकुंचन होऊन त्या बीज रूप होतात, आणि याच बीजाला सत्कृत्यांचे पाणी मिळाले म्हणजे तीच रुजून त्यांचा मोठा वृक्ष होतो. सत्कृत्ये आणि सद्विचार या गोष्टी या बीजाचें पोषण करतात आणि त्याला मोड आणून वाढीस लावतात. अशा रीतीने हे झाड वाढीस लागून शेवटी पहिल्या पूर्ण दशेला येतें. अद्वैतवाद्यांचा जो थोडासा मतभेद या ठिकाणी आहे, तो इतकाच की ही उत्कांति आत्म्याची नसून सृष्टीची आहे असे ते म्हणतात. उत्क्रमण अथवा अपक्रमण यांपैकी कोणत्याही अवस्थेचा संपर्क आत्म्याला लागत नाहीं असें अद्वैतवाद्यांचें