पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


स्यांत असल्यामुळे क्षणभर विरोधाभास उत्पन्न झाला तरी वास्तविक विरोध तेथे नाही. सर्व उपनिषदांचा आरंभ द्वैतांत झाला असून त्यांची अखेर अद्वै- ताच्या अत्युच्च आणि उत्कट कल्पनांत झाली आहे, असे मला आढळून आले.
 याकरिता द्वैतवादी आणि अद्वैती यांनी परस्परांशी तंटा करण्याचे काहींच कारण नाही. हीच गोष्ट माझ्या सद्गुरूंच्या प्रत्यक्ष जीवनक्रमावरूनही माझ्या अनुभवास आली. अमुक एक मत तेवढेच खरे आणि बाकीची सारी खोटी असा भाग नसून सर्व मतांनी गुण्यागोविंदाने एकत्र वास करावा अशी स्थिति आहे. मानवकुलाला या साऱ्यांचीच गरज असल्यामुळे ती सारीच खरी आहेत असे म्हणण्यास काय हरकत आहे? मानवकुलाच्या अंतिम कल्या- णासाठी सारीच आवश्यक आहेत. अखेरच्या हेतूच्या सिद्धीसाठी अद्वैत मत जितकें जरुरीचे, तितकेंच द्वैतही जरुरीचे असल्यामुळे ते नष्ट होऊ शकत नाही. फार काय, पण ही सारी मतें परस्परावलंबी आहेत असेही म्हणण्यास प्रत्यवाय नाही. यांतील प्रत्येकाचे जीवित दुसऱ्यांच्या अस्तित्वावर अवलं- बून आहे. यांतील प्रत्येक इतरांचे पोषक असून इतरांकडून त्याच्या पोष- णास मदत होत असते. अनेक भाग मिळून ज्याप्रमाणे एखादा अखंड पदार्थ बनलेला असतो, त्याप्रमाणे ही सारी मते मिळून मनुष्यमात्राचे धर्मजीवन बनले आहे. शरिराच्या साऱ्या क्रिया सुरळीत चालण्यास आणि तें जिवंत राहण्यास ज्याप्रमाणे अनेक अवयवांची जरूर आहे, त्याचप्रमाणे मानवकु- लाचें धर्मजीवन कायम राहण्यास या साऱ्या मतांच्या अस्तित्वाची जरूर आहे. यांतील प्रत्येक मत जिवंत राहिले म्हणजे ते दुसऱ्याच्या पोष- णाच्या उपयोगी पडते. यांतील एखादें पायाच्या जागी बसते, दुसरें इमारतीची जागा घेतें आणि तिसरें कळसाच्या जागी विराजमान होतें. अशा रीतीने ही सारी इमारत पुरी होत असते. यांतील एक मुळासा- रखें, दुसरें वृक्षासारखें आणि तिसरे एखादे फळासारखें असतें. ध्यानांत ठेवण्याचा मुख्य मुद्दा इतकाच की ही सारी मतें परस्परविरोधी नसून पर- स्परांची पोषक आहेत. याकरितां उपनिषदांच्या मूळ संहितेची ओढा- ताण करण्याचा यत्न मला अत्यंत हास्यास्पद वाटतो. उपनिषदांतील उच्च तत्त्वज्ञान क्षणभर बाजूस ठेवले तरी त्यांची नुसती भाषासुद्धां इतकी कर्ण- मनोहर आहे की तुमचें चित्त ती तत्क्षणींच मोहून टाकते. त्यांतील ईश्वर-