पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


मताचा फोलपणा तेव्हांच कळून चुकेल. प्रत्येक उपनिषदांत भक्ति भरपूर आहे. मात्र ती दिसण्यास आपणांस तशी दृष्टि पाहिजे. आता इतकी गोष्ट मात्र खरी की स्मृतिपुराणांतून ज्या काही तत्त्वांचा पूर्ण विकास आढळतो, ती तत्त्वे केवळ बीजरूपाने मात्र उपनिषदांत आहेत. जणूं काय, उपनि- षदांनी केलेल्या नकाशावरून पुढील इमारत स्मृतिपुराणांनी बांधली. ज्याचें उगमस्थान उपनिषदांत नाही, असें एकही मत अथवा असा एकही पंथ उभ्या हिंदुस्थानांत तुम्हांस आढळावयाचा नाही. उपनिषद्ग्रंथांशी ज्यांचा फारसा परिचयही नाही, अशा कांहीं पंडितंमन्यांनी भक्तीच्या उगमाचा शोध उप- निषदांबाहेर दुसऱ्या कोठे लावण्याचे यत्न केले होते; पण हे सारे यत्न अगदी निष्फळ झाले आहेत, हे आपणां सर्वांस आतां ठाऊक आहेच. संहिता ग्रंथ उपनिषदांच्या अगोदरच्या कालांतले असतांही भक्तीचा उल्लेख त्यांत आहे; मग उपनिषदांत तो आहे हे वेगळे सांगण्याचे प्रयोजनच नाही. पर• मेश्वरपूजन आणि भक्तीचे अनेक प्रकार या साऱ्यांची बीजें उपनिषदांत आहेत. संहितांच्या कालानंतर व उपनिषदांनंतरही भक्तीचे ध्येय आणि स्वरूप ही दिवसेंदिवस अधिक उच्च होत गेली हे मात्र खरें. संहितांत भेणे- भावाची भक्ति पुष्कळ वेळां आढळून येते. भक्ताचे चित्त भीतीने कंपायमान झाले असल्याचे तेथे पुष्कळ वेळां आढळतें. वरुणासमोर अथवा दुसऱ्या एखाद्या देवासमोर त्याचा भक्त चळचळां कांपत उभा आहे, असा देखावाही तेथे आपणांस दिसतो. आपण पापी आहों ही कल्पना चित्तांत येऊन भक्ताचें चित्त कावरेबावरें झालें आहे असेंही आपणांस दिसते. पण उपनिषदांत असल्या गोष्टींस थारा मिळण्यास कोठे स्थळच नाही. उपनिषदांत भेणेभाव तुम्हांस कोठेही आढळावयाचा नाही. शुद्ध भक्ति आणि शुद्ध ज्ञान एवढया दोनच वस्तू तुम्हांस तेथें सांपडतील.
 उपनिषदें हे आमचे धर्मग्रंथ आहेत; आणि त्यांच्या अर्थासंबंधी अनेक वादविवाद झाले असून अनेकांनी त्यांचे अर्थ अनेक प्रकारचे लावले आहेत. पुराणें अथवा स्मृतिग्रंथ आणि उपनिषदें यांत मतभेद होईल तेथे पुराणे मागे पडून उपनिषद्वचन प्रमाण मानावें, हा शास्त्रार्थ मागे एकवेळां मी आप- णास सांगितलाच आहे. तथापि असे असतांही आमचा प्रत्यक्ष आचार पाहिला तर वैदिक धर्मानुयायी या नांवापेक्षा पौराणिक धर्मानुयायी हेच