पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवमः


म्हणजे समग्र वृक्ष असें मात्र नव्हे. उपनिषदांबद्दल जितका पूज्यभाव अद्वै. तवादी बाळगतात, तितकाच विशिष्टाद्वैतवादीही तो बाळगतात. त्याचप्रमाणे स्वमताच्या पुष्टीकरणासाठी उपनिषदांचा आधार अद्वैती जितका घेतात, तितकाच विशिष्टाद्वैतीही तो घेतात. हीच गोष्ट द्वैतवाद्यांसही लागू आहे; आणि अशाच प्रकारचा संबंध उपनिषदें आणि इतर मतें व पंथ यांतही आहे. अशा प्रकारे वेदान्त ग्रंथांचा आधार सर्वांस सारखाच असतांही वेदान्ती म्हणजे अद्वैती असा अर्थ सामान्य जनांच्या मनांत पक्का रूढ होऊन गेला आहे; आणि असे होण्यास थोडेसें विशेष कारणही घडले आहे. अद्वैत मताचे आधारस्तंभ आद्य श्रीशंकराचार्य आणि त्यांच्या नंतर होऊन गेलेले त्याच मताचे आचार्य यांनी स्वमताच्या पुष्टीकरणासाठी उपनिषदांवर जितकी भिस्त ठेविली आहे तितकी ती स्मृति वगैरे ग्रंथांवर ठेवलेली नाही. स्मृति आणि पुराणे हे ग्रंथ वेदकालानंतरचे असून श्रुतितत्त्वांच्या आचाराचा मार्ग यांत स्पष्ट केला आहे. तत्त्वांचा प्रत्यक्ष आचार कसा असतो हे दाखविण्याकरि- तांच पुराणें जन्मास आली. तथापि श्रुतिग्रंथांना जो मान आहे तो या ग्रं- थांना नाही हे स्वाभाविकच आहे. श्रुति आणि स्मृति अथवा पुराणे यांत मतभेद झाला तर श्रुतीचे वचन आम्ही प्रमाण मानतों व स्मृतीचें अथवा पुराणांचें वचन तेवढयापुरतें मागे पडते. कोणत्याही मतनिर्णयाच्या प्रसंगी श्रुति हीच प्रमाण धरावी असा नियम आहे. यामुळे श्रीशंकरादि आचार्यांनी श्रुतींचे आधार जितके दाखविले आहेत, तितके स्मृतींचे अथवा पुराणांचे दाखविले नाहीत. जेथे श्रुतीचा आधार मिळण्यासारखाच नव्हता, अशा ए- खाद्या प्रसंगी मात्र स्मृतीकडे अथवा पुराणाकडे त्यांनी बोट दाखविले आहे.. उलट पक्षी इतर मतवाद्यांनी स्मृति-पुराणांचा आश्रय अधिक प्रमाणावर केला असून, श्रुतीकडे त्यांचा ओढा कमी कमी होत गेला आहे. द्वैताच्या बाजूला एखादें मत जों जो अधिक झुकत जातें तों तो श्रुतींचा आधार सोडून स्मृति-पुराणांकडे धाव घेण्याची त्यांची प्रवृत्ति अधिकाधिक वाढत जाते असें आपणास आढळून येईल. केवळ तत्त्वमार्गाचा विचार करूं जाणान्या कोणत्याही पंथाने उपनिषदांसारख्या शुद्ध ज्ञानप्रवर्तक ग्रंथांचा आधार घ्यावा अशी आपली स्वाभाविक अपेक्षा असते; पण द्वैत ग्रंथांत ही आपली अपेक्षा पूर्ण होत नाही. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे वेदान्ती म्हणजे अद्वैती असा