पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

एकाच लाथेबरोबर तिचा प्राण जाईल. तिला भिऊ नका. किती वेळा आपला पराजय झाला याची मोजदाद कशाला करतां? आपला पराजय कधी झालाच नाही असें म्हणा. या गोष्टी ध्यानांतच घेऊ नका. आज पराभव झाला असला तर उद्यां जय होईल. ' कालोह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी। ' तुम्ही एकसारखे पुढे चला. आपल्या गुप्त सामर्थ्याला तुम्ही एकसाररखे चेतवीत राहिला तर आज ना उद्यां तें जागे होईलच होईल. दुसऱ्या कोणाची तरी मदत मिळविण्याकरितां साऱ्या जगभर तुम्ही याचना करीत हिंडला तरी तुम्हांस मदत कोण करू शकणार ? मृत्यूचे भय कसें नष्ट करावे याची युक्ति कोणास सांपडली आहे! आणि ज्या कोणास ती सांपडली असेल तो ती तुम्हांला कशी देणार ? हे काम तुमचे तुम्हीच केले पाहिजे. हा रस्ता तुम्हीच शोधून काढला पाहिजे. मित्रांनो, या कामी कोणाचीही मदत तुम्हांस मिळणार नाही. ' आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ' हे भगवंताचे वचन तुम्ही नित्य लक्ष्यांत बाळगा. आत्मदर्शन करून घ्या. उठा, उभे रहा; भीति टाकून द्या. कसलीही संकटे आली तरी डगमगू नका; आत्मविश्वास धरा, आणि आत्मदर्शनाची खटपट करा. पहिल्या पहिल्याने त्याचे मंदकिरण तुम्हांस प्राप्त होतील; तथापि निराश होऊ नका. तुम्ही त्याला तसेच चिकटून राहिला म्हणजे हळु हळु तुमच्या ठिकाणी धैर्याचा प्रवेश होईल, आणि अखेरीस ' शिवोऽहं शिवोऽहं ' अशी सिंहगर्जना तुम्हीच करूं लागला.
"न मृत्युर्न शंका न मे जातिभेदः । पिता नैव मे नैव माता च जन्म ॥
न बंधुन मित्रं गुरुनैर्व शिष्यः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥
अहं निर्विकल्पी निराकाररूपी । विभुत्वाञ्च सर्वत्र सर्वेद्रियाणाम् ॥
न चासंगतं नैव मुक्तिन मे यः। चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"
 मी क्षुद्र आहे अशी भावना जो कोणी करतो तो मोठी चूक करीत असतो. कारण सर्वत्र एकरूपं अस्तित्वच पसरले आहे. सूर्य आहे असे म्हणणारा मी आहे म्हणूनच सूर्याला अस्तित्व आहे. जग आहे असें मी म्हणतों म्हणून जगाला अस्तित्व आहे. माझ्या अस्तित्वावेगळे त्यांना अस्तित्व असणे शक्यच नाहीं; कारण मी सच्चिदानंद आहे. मी सदा सुखी, सदा पवित्र आणि सदा शोभायमान असा आहे. सूर्य हा आपणा सर्वांच्या दृष्टीचे कारण आहे; तथापि कोणाच्याही डोळ्यांच्या दोषानें तो लिप्त होत