पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.

--------

 आमचा धर्म आणि आमचें कुल यांचा निदर्शक असा एक शब्द सर्वांच्या सामान्य परिचयाचा झाला आहे. हा शब्द 'हिंदु' असा आहे. वेदान्त धर्म आणि हिंदु यांचा परस्परसंबंध काय आहे याचे स्पष्टीकरण येथे करणे अवश्य आहे. आमच्या देशांत सिंधु या नांवाची एक नदी आहे. याच नदीला प्राचीन पारसीक लोकांनी हिंदु असें नांव दिले होते. संस्कृत भाषेत जेथे 'स' हा वर्ण येतो तेथें त्याचे रूपांतर 'ह'या वर्णांत पारसीक लोक करीत असत. याच रीतीनें सिंधु या शब्दाचे रूपांतर हिंदु असें झालें. 'ह' या वर्णाचा उच्चार करणे ग्रीक लोकांस फार जड जाई; यामुळे त्यांनी तो 'ह' कारही गाळला आणि हिंदु याचे आणखी एक रूपांतर होऊन इंडियन हा शब्द बनला. सिंधु नदाच्या परतीरी राहणाऱ्या लोकांस प्राचीन पारसिकांनी हिंदु हे नांव दिले. त्या काळी या शब्दाचा प्रचार कोणत्याही अर्थाने होत असला तरी सांप्रत तो अर्थ नष्ट झाला आहे. कारण सिंधुनदाच्या दक्षिणेस राहणारे सांप्रतचे लोक एकाच धर्माचे नसून त्यांत आतां अनेक धर्मानुयायांची वस्ती आहे. त्यांत हिंदु आहेत, मुसलमान आहेत, पारसी आहेत, ख्रिस्ती आहेत, बौद्ध आहेत. आणि जैनही आहेत. 'हिंदु' या नांवाचा केवळ शब्दार्थ घेतला तर या सान्यां- सच हिंदु हे नांव द्यावे लागेल; पण एका विशिष्ट धर्माचा वाचक या अर्थाने त्याचा उपयोग करावयाचा असेल तर या सर्वांस हिंदु हे नांव देता येणार नाही हे उघड आहे. वास्तविक पाहतां हिंदु धर्मात अनेक धर्मातील तत्त्वांचा अंतर्भाव झालेला आहे. तो धर्म कोणत्याही प्रकारे एकदेशीय स्वरूपाचा नाही. अशा प्रकारच्या सर्वगामी धर्माच्या स्वरूपाचे बोधक असें एकच नांव देणे बहुतांशी दुरापास्त आहे. या धर्मात अनेक स्वरूपांची तत्त्वे आहेत, अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. यांत नानाविध आचार तुम्हांस आढळतील. हे सारे प्रकार कांहीं सुसंघटित रूपाचे आहेत असेंही नाही. काही विशिष्ट आचार ठरलेले आहेत असेंही नाही. अमुक पंथाचे अमुक निश्चित आचार आहेत असें तुम्हांस सांगता येणार नाही. या साऱ्या विविधतेत एकवाक्यता