पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] भक्ति .१६३


होतें की आपल्या विस्ताराने सारे विश्व तें व्यापून टाकतें. आरंभी काजव्या- सारखी लुकलुकणारी अल्पशी ज्योत अखेरीस इतकी प्रखर आणि तेजोमय होते की, आपल्या दिव्य प्रकाशाने सारे विश्व ती उजाळते. आरंभींचे अल्प आणि आकुंचित रूप अनंत होते. परमेश्वर कोठे तरी आकाशाच्या कोपऱ्यांत दडी मारून बसला आहे, ही आरंभींची भावना नष्ट होते, आणि त्याचा वास सर्वत्र आहे, किंबहुना तोच सर्व आहे असा अनुभव अखेरीस येतो. अशा रीतीने मनुष्याचे रूपांतर परमेश्वरांत होते. आरंभी नररूपाने नारायणाकडे जाऊ पाहणारा मनुष्य अखेरीस स्वतःच नारायण होऊन बसतो. वस्तुतः तो आरंभींच नारायण होता, पण तसा अनुभव त्याला नव्हता. मी नर आहे असा भ्रम त्याला झाला होता. त्याच्या चित्तांत ज्या अनेक तृष्णा होत्या त्यांनी हा भ्रम उत्पन्न केला होता. या तृष्णा एकामागून एक नाहीशा होत चालल्या आणि त्यांजबरोबर आकुंचित स्वार्थबुद्धिही लोपूं लागली; आणि अखेरच्या मुक्कामास नर आणि नारायण एकच आहेत असा अनुभव त्याला

आला.


-----