पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


असें त्यांस कधीच वाटत नसते. त्यांची भक्ति म्हणजे वाण्याचे बाजारी प्रेम नव्हे. त्यांची भक्ति म्हणजे बाजारात मिळणारा सवदा नव्हे. भक्तीचा मार्ग भक्ति, भक्तीचे साध्य भक्ति आणि भक्तीचे फळही भक्तीच. पण या फळाचा गुण काय आहे पहा! भवरोगाचे पूर्ण निर्मूलन करण्याची दिव्य औषधि हीच. सर्व दुःखांचा पूर्ण परिहार करण्याचे सामर्थ्य एकट्या भक्तीला मात्र आहे. मनुष्यमात्राला जो संसाररोग जडला आहे आणि जो त्याच्या हाडी- मासी खिळून बसला आहे, तो नाहींसा करावयाचा असेल तर या रसाचा एक प्याला घ्या आणि अनुभव पहा! या रसाचे आकंठ पान तुम्ही केले तर परमेश्वरी उन्मादवायु तुम्हांस होईल, आणि आपण मनुष्य आहों ही वस्तु- स्थितिसुद्धा तुम्ही विसरून जाल.
 परमात्मप्राप्तीचे मार्ग वेगवेगळे असून ते परस्परांपासून अगदी भिन्न आहेत, असा आभास आरंभी होत असला तरी हे सारे मार्ग अखेरीस एकत्र होतात असें आपणांस आढळून येईल. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हाच सर्व मार्गांचा अ- खेरचा मुकाम आहे. वेगवेगळ्या बिंदूंपासून निघालेले वेगवेगळे रस्ते या ठिकाणी एकवटून एकरूप होतात. साऱ्या रस्त्यांचे अंतिम पर्यवसान एकच. आरंभी आपण सारे द्वैतीच असतो. 'मी परमात्मरूप आहे' असे आपणास कधी चुकूनसुद्धां वाटत नाही. केवळ बुद्धिवाद करतांना अशा प्रकारची भाषा आपण क्वचित् प्रसंगी वापरली तरी त्या वेळी सुद्धा आपल्या भाषणास आपले मन ग्वाही देत नसते. आपण बोलतों ते आपल्या अनुभवाबाहेरचें बोलतों, असें तेव्हांसुद्धा आपणांस वाटत असते. परमात्मरूपापासून आपण भिन्न आहों, हीच आपली आरंभीची भावना असते. मी वेगळा आणि परमे- श्वर माझ्याहून वेगळा असे आपणांस वाटत असते. यानंतर भक्तीचा उदय होऊ लागला म्हणजे मनुष्य परमेश्वरासंनिध जाऊं लागतो आणि आपल्या बाजूनें परमेश्वरही मनुष्याजवळ येऊ लागतो. 'तूं माता, तूं पिता, तूं बंधु' इत्यादि अनेक रूपांनी मनुष्याची भक्ति स्पष्टदशेस येऊ लागते, आणि अखेरीस भक्त व ईश्वर हे एकरूप होऊन जातात. 'तूं आणि मी एकच आहों व तुझे पूजन करण्यांत मी स्वतःचीच पूजा करतो' असें भक्त म्हणू लागतो. भक्तीच्या आरंभींच्या स्वरूपाचे अंतिम पर्यवसान अशा प्रकारचे आहे. भक्तीचे आरं- भींचे स्वरूप अत्यंत आकुंचित असते, आणि अखेरीस ते इतके विशाल