पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] भक्ति. १६१


काय हेच समजेनासें होतें. तुझ्या अस्तित्वावांचून कालाचे अथवा दुसऱ्या कशाचेही अस्तित्व स्फुरेनासें होतें.' असे शब्द जगांतील सर्व भाषांत आणि सर्व धर्मात तुम्हांस आढळतील. या भक्तीचे वेड असे आहे. सर्व आशा, इच्छा आणि कल्पना मरून गेल्या म्हणजे ही एकटीच शिल्लक उरते. मग भक्त म्हणतो, “मला मुक्तीची काय जरूर आहे ? मुक्तीची फिकीर कोण करीत बसतो ? फार काय, पण पूर्णत्व पावण्याचीही इच्छा मला नाही, आणि स्वतंत्र होण्याचीही गरज नाही." खऱ्या भक्ताची भाषा या प्रकारची असते.
 "मला संपत्ति नको आणि शक्तिही नको. माझें शरीर सुस्थितीत आहे की नाही, याचीही पर्वा मी करीत नाही. मला सौंदर्य नको, आणि बुद्धिही नको. या जगांत अनेक प्रकारची दुःखें भरली असली तरी त्यांत पुनः पुनः जन्म घेऊन तुझी भक्ति करावी असे मला वाटते. तुझी भक्ति मला प्राप्त होत असेल तर दुःखमय जगांत हजारों जन्म आले तरी मला त्यांची खंती वाटणार नाही." अशा प्रकारच्या काव्यमय उद्गारांत भक्तीचा सारा उन्माद तुम्हांस आढळून येईल. प्रेमाची जितकी स्वरूपें या जगांत स्पष्टत्वास येतात, त्या सर्वांत स्त्रीपुरुषांच्या प्रेमात त्याचे उत्तान आणि अत्यंत उत्कट रूप व्यक्त झालेले असते. यामुळे परमेश्वरविषयक प्रेम अथवा भक्ति व्यक्त करतांनाही तसल्याच प्रकारच्या भाषेचा उपयोग सर्वत्र होत असल्याचे आप- णास आढळून येते. संतांच्या आणि भक्तांच्या हृदयांत ज्या प्रेमाचा वास असतो, त्याचा एक अंधुकसा किरण तुम्हांस स्त्रीपुरुषांच्या प्रेमांत आढळून येईल. परमेश्वराच्या प्रेमाने खरा भक्त वेडापिसा होऊन जातो, किंबहुना त्या प्रेमाने वेडे व्हावें अशी त्याची इच्छाच असते. भक्तीने त्याचे चित्त बेफाम आणि बेभान होऊन जाते. भक्तीचा उन्मादवायु त्याला पछाडतो, आणि भक्तिरसाचे आकंठ पान केल्यामुळे तो धुंद झालेला असतो. सांपडेल तेथे भक्तिरस प्यावा अशी इच्छा भक्तीमागे लागलेल्या मनुष्यांस असते. तेथे जातगोताचा विचार त्यास शिवतसुद्धा नाही. जगांतल्या कोणत्याही धर्मा- तील आणि कोणत्याही जातीच्या संतानें भक्तिरसाचा साठा करून ठेवल्याची बातमी त्यास लागली की त्यांतला आस्वाद आपणास कसा मिळेल एवढेच चिंतन त्याचे चित्त करूं लागते. अशा भक्ताला कसल्याही प्रकारच्या प्रति- फलाची अपेक्षा नसते. भक्तीच्या बदल्यांत अमुक एका वस्तूची प्राप्ति व्हावी

स्वा० वि० ख०-९-११