पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


विचार तो करीत असतो. त्याचा स्वार्थ त्या वेळी अत्यंत आकुंचित रूपाचा असतो. त्याने लग्न केलें म्हणजे त्याचें आत्मरूप दुप्पट होते, आणि मुलें झाली म्हणजे हेच मूळ रूप आणखी किती तरी पटींनी विस्तार पावते. हा विस्तार असाच वाढत गेला म्हणजे हाच पुरुष अनंतपटीनें विस्तृत होऊन 'हे विश्वचि माझें घर' असे म्हणू लागतो आणि अखेरीस आपणच चराचर रूप होऊन जातो. साऱ्या विश्वांतील प्रेम त्याच्या ठायीं एकवटतें, तो प्रेमनि- धान बनतो; आणि प्रेमनिधान, हेंच परमेश्वराचे रूप होय.
 पराभक्तीला पोहोचण्याचा मार्ग हा आहे. भक्तीच्या या कोटींत सर्व चिन्हें, विधी आणि बाह्योपचार ही गळून जातात. या भक्तीच्या स्थितीपर्यंत जो कोणी पावता झाला असेल तो अमुक एका विशिष्ट पंथाचा अथवा धर्माचा असें म्हणवत नाहीं; कारण सर्व धर्म आणि पंथ त्याच्या ठिकाणी एकवटलेले असतात. मग यांपैकी कोणता एक अमुक पंथ त्याचा असा कसा म्हणावा? पूर्णपणे स्वतःच्या ठिकाणी त्याला सांठवू शकेल असा पंथ तरी कोणता? अशा प्रकारें मुख्यतः पराभक्तीच्याच पायावर ज्या धर्माची उभारणी झाली आहे, त्या धर्मात ती भक्ति स्पष्टत्वास आणण्याची धडपड एकसारखी सुरू असते असें आपणास आढळून येईल. या पराभक्तीची अंधुकशी तरी कल्पना आप- णास असते. त्याचप्रमाणे या जगांत प्रत्ययास येणारे प्रेम आणि आकर्षण हीसुद्धा त्याच भक्तीची स्वरूपे आहेत हेही आपणास कळत असते; तथापि जगांतल्या सर्व धर्मातील संत आणि सत्पुरुष हीच भक्ति अनेक प्रकारांनी व्यक्त करण्याची धडपड करीत असतात असे आपणांस आढळून येईल. फार काय, पण विषयसुखाचे रूपांतरही पराभक्तींत करण्याची त्यांची धड पड सुरू असते. भाषेत जे काही सामर्थ्य असेल त्या साऱ्याचा उपयोग परा- भक्तीची व्याख्या करण्याकडे ते करीत असतात. अत्यंत जड विषयांचें रूपांतर चैतन्यरूपांत करण्यासाठी त्यांची धडपड अव्याहत सुरू आहे.
 “प्रिय परमेश्वरा, तुझ्या ओष्ठांचे चुंबन ज्याला एकवार लाधलें त्याची प्रेमपिपासा एकसारखी वाढतच जाते; मग तुझ्याशिवाय अन्य कोणताही विषय त्याला गोड लागत नाही. त्या चुंबनसुखांत सारी लौकिक दुःखें बुडून नाहीशी होतात, साऱ्या भूतकालाचे विस्मरण होतें, वर्तमान आठवत नाहींसा होतो आणि भविष्याच्या अस्तित्वाची जाणीवच नाहीशी होते. काल म्हणजे