पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]भक्ति.१५७


असते आणि केवळ याच ध्येयाशी आपली पूर्ण तन्मयवृत्ति होते, त्या वेळी आपल्या सर्व शंका निरस्त होतात. आपल्या उच्चतम ध्येयाशी आपले पूर्ण तादात्म्य झाले म्हणजे वादविवादासही जागा उरत नाही. परमेश्वराला खरो- खरच अस्तित्व आहे की नाही, त्याचे अस्तित्व प्रत्यक्ष प्रमाणांनी सिद्ध करतां येईल की नाही, इत्यादि प्रश्न डोक्यात उद्भवतच नाहीत; मग त्यांजबद्दल वाद- विवाद कोण करीत बसणार? माझ्या ध्येयाशी एकवार जो मी एकरूप झालों तो कायमचाच झालो. त्यांत आतां कालत्रयांतही बिघड व्हावयाचा नाहीं. त्याच्याशी मी नित्य एकरूप असणे हाच माझा प्रकृतिस्वभाव; मग त्यांत अंतर कसे पडणार ? माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची शंका माझ्या मनांत येईल, तेव्हांच माझ्या ध्येयाच्या अस्तित्वाबद्दल माझें चित्त साशंक होईल. मी आहे की नाहीं असा प्रश्न माझ्या मनांत कधीं चुकून तरी उद्भवतो काय? माझें अस्तित्व माझ्या दृष्टीने जितकें खरें तितकेंच माझ्या ध्येयाचे अस्तित्वही मला खरे वाटत असते. अशा स्थितींत परमेश्वर सर्वशक्तिमान् आहे की नाही, तो दयाळू आहे की नाही इत्यादि प्रश्नांची चर्चा कोण करीत बसतो? तो कसाही असला तरी त्याची पर्वा मला काय आहे ? तो मनुष्यजातीचे पालन कर- णारा प्रेमळ पिता आहे की एखाद्या प्राचीन सुलतानासारखा कडकशास्ता आहे याचाही विचार मी करीत नाही. रामराजासारखा तो प्रजेचे पालन प्रेमाने करतो, की प्रजेस पिळून आपलीच तुंबडी भरतो हेही मी पाहत नाही. खरा भक्त असतो तो या सा-या चवकशा ओलांडून पलीकडे गेलेला असतो. शिक्षा आणि बक्षिस या दोहोंच्या पलीकडे तो असतो. भक्ताच्या निवास- स्थानाचा शोध शास्त्रांस लागावयाचा नाही आणि त्याचे अस्तित्वही कोणास सिद्ध करता यावयाचें नाही. जेथें भक्ति राहते त्या स्थानापर्यंत कोणतेही शास्त्र आजपर्यंत पोहोंचलेले नाही आणि पुढे कधी पोहोंचावयाचेही नाही. भक्ति हेच भक्ताचे ध्येय आणि तेंच त्याचे अखेरचे ठिकाण. त्याचा आरंभ भक्ति, मध्य भक्ति आणि अंतही भक्ति. भक्तीशिवाय दुसरें कांहीं तो जाणत नाही, आणि काही जाणावें अशी गरजही त्याच्या बुद्धीला कधीं भासत नाही. वास्त. विक पाहतां शुद्ध प्रेमरूपाच्या अस्तित्वाच्या सिद्धीची गरज तरी आपणांस कां भासावी ? या विश्वाचें सारें अस्तित्व हेच प्रेमाच्या अस्तित्वाचे चिन्ह आहे. प्रेमाला अस्तित्व नसेल तर हे विश्वही अस्तित्वात येणार नाही. एका