पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


दिसत नाही. वस्तुतः त्यांचे प्रेम बाह्य विषयावर जडलेलेच नसते. त्यांच्या अंतःकरणांतील चित्राला जागृति आणण्याचे काम मात्र बाह्य विषय करतो. अंतःकरण जागृत झाले की त्यांतील प्रतिमा तेथून जी निघते ती थेट त्या बाह्य विषयावर आदळून त्याचे स्वरूप झांकून टाकते. अशा स्थितीत द्रष्टा असतो तो त्या चित्राकडे पहात असतो आणि त्यावर प्रेम करीत असतो. हीच गोष्ट आपणा सर्वांच्या प्रेमस्थानास लागू आहे. आपली भावंडे आपणास फार सुरेख वाटतात. ती खरोखरच तशी सुस्वरूप असतात असे नाही. त्यां- पैकी कित्येकांची गणना लोक अगदीच सामान्यांत करीत असतात; तथापि असे असतांही हा माझा भाऊ अथवा ही माझी बहीण एवढया आपलेपणाच्या विचारापुढे आपणास ती सुरूप दिसतात.
 एकंदर दृश्यजाताची मीमांसा वस्तुतः हीच आहे. आपण आपल्याच ध्येयाचा आरोप सृष्ट पदार्थावर करून त्यांचे पूजन करीत असतो. बाह्य पदार्थ ही केवळ अंतःकरणजागृतीची साधने आहेत. अंतःकरणाला चेतवि- विण्याचे कार्य ही बाह्य कारणे करीत असतात. आपणांपुढे जो जो पदार्थ आपण पाहत असतो त्याचे जन्मस्थान आपलेच अंतःकरण होय. त्याला जन्म आपणच देतो आणि त्याकडे पाहून 'अमुक बाह्य पदार्थ मी पाहिला' असे आपण म्हणतो. वाळूचा एक कण शिंपल्यांत शिरतो आणि तेथे दाह उत्पन्न करतो. असा दाह उत्पन्न झाला म्हणजे त्यामुळे शिंपल्याला पाझर सुटून त्यांत चिकट रस उत्पन्न होतो. हा रस त्या कणाभोंवतीं जमून त्याचे सुंदर मोती बनते. त्याचप्रमाणे बाह्य उपाधि आपल्या अंतःकरणांत शिरून तेथे जागृति उत्पन्न करतात. ही चळवळ सुरू झाली म्हणजे आपली विचार- परंपरा तिजभोंवतीं जमू लागते आणि या संयोगांतून अखेरीस आपले ध्येय निर्माण होते. दुष्ट मनुष्याला हे जग भयंकर नरकासारखे दिसत असते आणि सज्जनाला तेंच स्वर्गरूप भासते. प्रेमी मनुष्याला या जगांत प्रेमाशिवाय काही दिसत नाही आणि द्वेष्टयाला तेथेंच द्वेष दिसतो. भांडकुदळाला तें समरभूमि- सारखे दिसते आणि शांतिप्रियाला तेंच शांतीचे निवासस्थान दिसते. पूर्णत्व पाव- लेल्या मनुष्याला हेच जग पूर्णस्वरूप म्हणजे परमात्ममय दिसते. अशाच रीतीने आपणांपैकी प्रत्येकजण आपापले ध्येय निर्माण करून त्याची पूजा करीत असतो. आपणांपैकी प्रत्येकापुढे असेंच कोणतेतरी उच्चतम ध्येय म्हणून मांडले