पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


शिक्षा करील अशी भावना बाळगून त्याची प्रार्थना तुम्ही केली तर तिला भक्ति असें नांव देता येईल काय ? ज्याच्याबद्दल आपल्या मनांत भीति असते, त्याजबद्दल तेथें प्रेम उद्भवणे कधीतरी शक्य आहे काय ? कोंकराचें प्रेम लांडग्यावर जडलें असें कधी झाले आहे काय ? उंदराने मांजराच्या गळ्यांत प्रेमाने कधी मिठी मारली आहे काय ? गुलामानें धन्याला कधी आ- लिंगन दिले आहे काय ? गुलामही प्रेमाचे सोंग कधी कधी आणतात, पण नाटकांतल्या राजाची जी राजेपणाची किंमत तीच या प्रेमाचीही होय. अस- ल्या प्रेमाला प्रेम हे नांवसुद्धां शोभणार नाही. भीति आहे तोवर प्रेम उद्भवणे शक्य नाही. असे घडल्याचे एक तरी उदाहरण तुमच्या पाहण्यांत कधी आले आहे काय ? भीति असतां प्रेम दिसणे हे प्रेमाचे नुसते नाटक आहे. खऱ्या प्रेमाच्या ठिकाणी भीतीचा लवलेशही असावयाचा नाही. अशी कल्पना करा की एखादी स्त्री रस्त्याने जात आहे इतक्यांत एखादा कुत्रा तिच्या आंगावर भोंकू लागला. अशा स्थितीत ती काय करील? अगदी जवळच्या घरांत ती पळून जाईल. आतां असेंही समजा की दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला हातीं धरून ती जात आहे, इतक्यांत एखादा सिंह उडी मारून पुढे आला. अशा स्थितीत ती पळून जाणार नाही. आपल्या मुलाचा जीव वाचविण्या- करितां ती सिंहाच्या तोंडावर चालून जाईल. मुलाच्या प्रेमाने तिची भीति नाहीशी होईल. प्रेम हे नेहमीच भीतीला जिंकीत असते. ईश्वरविषयक प्रेमाला म्हणजे खऱ्या भक्तीलाही हाच नियम लागू आहे. परमेश्वरावर ज्याचे खरे प्रेम आहे तो त्याच्या गुणांचा विचार करीत नाही. तो बक्षीस देणारा दाता आहे की शिक्षा सांगणारा न्यायाधीश आहे याचा विचार खऱ्या भक्ताच्या चित्ताला शिवावयाचाही नाही. एखादा न्यायाधीश घरी आला म्हणजे त्याची प्रेमळ पत्नी त्याच्याशी कशी वागते पहा! तो न्यायाधीश आहे, दुष्कर्माचे शासन तो करतो अथवा सज्जनांस शाबासकी देतो, असल्या प्रका- रचे विचार तिच्या चित्ताला कधी तरी शिवतात काय? हा आपला पति आहे यावांचून त्याचे दुसरे कोणतेही स्वरूप ती जाणत नाही. त्याची मुले त्याचे कोणतें स्वरूप पाहत असतात? हा आपला प्रेमळ पिता यावांचून दुसरे कोण- तेंही त्याचे स्वरूप त्यांस ठाऊक नसते. “व्याघ्र सिंह भयानक । देखूनि

भयचकित होती लोक । परी तयांची पिली निःशंक । तयांपुढे खेळती ॥"