पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


आणि असें कां होऊ नये ? प्रकाशस्पंद सर्वत्र भरून राहिले आहेत. जेथे प्रकाश नाही अशी जागा पृथ्वीवर एकही नाही. अगदी काळा कुळकुळीत काळोख असला, तरी तेथेही घुबडाला दिसते. यावरून तेथें प्रकाशकिर- णांचे अस्तित्व आहे हे सिद्ध होते. मनुष्याच्या डोळ्यांना तेथे प्रकाशाचें अस्तित्व दिसत नसले, तरी तेथें प्रकाश नसेल तर घुबडालाही काही दिस- णार नाही. मनुष्याच्या डोळ्यांना हा प्रकाश दिवा, सूर्य, चंद्र, तारे, इत्यादि- कांच्या ठिकाणी मात्र दिसतो; आणि घुबडाला तोच प्रकाश काळ्याकुट्ट अं. धारांतही दिसतो. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो नाही असे ठिकाण कोठेच नाही. प्राणिमात्रांत त्याचे वास्तव्य प्रकट झाले आहे; तथापि मनुष्याला त्याचा प्रत्यय मनुष्याच्याच द्वारे येतो; आणि यामुळे मनुष्याच्या द्वारें मनुष्य परमेशपूजन नेहमीच करीत आला आहे. हा प्रकार काही आज- कालचा आहे असें नाहीं; कालाच्या आरंभापासून तो सुरू आहे. परमेश्व- राचा प्रकाश, त्याचे अस्तित्व, त्याचे चैतन्य जेव्हां मनुष्यदेहाच्या द्वारें प्रकाशतें, तेव्हांच मनुष्याच्या जाणिवेत ते येते. मनुष्यप्राण्याचा स्वभाव आहे असाच शिल्लक राहील तोपर्यंत हे असेंच असावयाचे. त्याच्याविरुद्ध कितीही ओरड तुम्ही केली तरी तिचा काही उपयोग नाही. असे होऊ नये म्हणून केवढीही धडपड तुम्ही केली तरी परमेश्वराचे स्मरण तुम्ही करूं लागलां की तुमचा स्वभाव अवश्य उसळून वर येईल, आणि मनुष्याची प्रतिमा तुमच्या मनश्चक्षूंपुढे उभी राहील. यामुळे बहुधा प्रत्येक धर्मात तीन वस्तूंचा समुदाय आढळून येतो. बाह्योपचार अथवा विधी, नाम आणि सत्पुरुष ह्या त्या तीन वस्तू होत. सर्व धर्मात हे त्रिकूट आहे, पण असें अस- तांही या बाबींत सर्व धर्म परस्परांशी लढाया करीत असतात. एक म्हणतो 'माझ्या धर्मात जें नाम सांगितले आहे. तेवढेच खरे; माझ्या धर्मात जें रूपवर्णन आहे तेच खरे रूप; आणि माझ्या धर्मात होऊन गेलेले सत्पुरुष तेवढेच खरे साधू; बाकी सब झूठ" आतां अगदी अलीकडे या मनो- वृत्तीत थोडासा फरक झालेला आहे. जुने धर्म हे ख्रिस्ती धर्माचे आगामी दूत होत असे ते म्हणूं लागले आहेत. या धर्मानी ख्रिस्ती धर्माच्या आग- मनासाठी पूर्वतयारी करून ठेवली आणि नंतर हा सत्यधर्म प्रकट झाला असे त्यांचे म्हणणे आहे. दगडापेक्षां वीट मऊ या नात्याने त्यांचे हे मतही