पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३२स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


 हे कारण ताव्यांत आणावयाचें हेच अभ्यासयोगाचे पहिले अवतारकार्य आहे. ते ताव्यांत आणणे अशक्य नाही असे आपणास आढळून येईल. आपल्या ठिकाणी जो विचारसमूह आज जाणिवेच्या प्रांतापलीकडचा होऊन बसला आहे त्याचा जन्म प्रथम जाणिवेच्या प्रांतांतच झाला आहे. त्याची उत्पत्ति प्रथम जाणिवेपासून झाली आणि नंतर खोल बुडी मारून तो जाणि- वेच्या हद्दीबाहेर गेला. यामुळे त्याच्या जन्मभूमीला त्याला परत आणणे अशक्य नाही. पूर्वी ज्या क्रिया जाणिवेने आपण केल्या, त्या कालांतराने आपण विसरून गेलों. यामुळे त्यांना केवळ जडरूप येऊन त्या जाणिवेच्या बाहेर गेल्या. आपल्या सध्याच्या वाईट कर्माना जशा या पूर्व क्रिया कारण होतात, त्याचप्रमाणे आपल्या सत्कार्यांचे कारणही या पूर्वक्रियाच होत हैं लक्ष्यात ठेवणे अवश्य आहे. आपली अंतःप्रकृति सत्कार्याकडे वळो अगर असत्कार्याकडे वळो; दोहींचे कारण एकच आहे. आपल्या सूक्ष्म देहाच्या पोतड्यांत असंख्य चिजा आपण भरून ठेवल्या आहेत. दीर्घकाळपर्यंत या खजिन्याची पाहणी आपण न केल्यामुळे त्यांत काय काय चिजा आहेत याचा विसर आपणास पडला आहे. त्या तेथे आहेत इतकेही स्मरण सांप्रत आपणास राहिलेले नाही. यामुळे त्यांजसंबंधी काही विचारही आपल्या मनांत येत नाही. त्यांतील कित्येकांस आतां अगदी कीड लागून जाऊन त्या नुक- सानकारक झाल्या आहेत. आपणास त्या केव्हां अपाय करतील याचा नेम नाही. यांतल्याच कित्येकांचा उद्रेक होतो आणि मनुष्यहानी करतो. या गुप्त विचारांचे सामर्थ्य असें भयंकर आहे की त्यामुळे देशचे देश बेचिराख होतात. या विचारांना परत ताब्यात घेऊन त्यांना जाणिवेच्या प्रांतांत पुन्हां नेऊन घालावें यासाठीच अभ्यासयोगशास्त्र अवतीर्ण झाले आहे. अनेक सुप्तासुप्त विचार एकत्र होऊन त्यांच्या संघटनेने मानवी जीवित बनले आहे. यांतील कांहीं विचारमात्र आज प्रत्यक्ष क्रिया करीत असून बाकीचे विचार तसेच निजून राहिले आहेत. या साऱ्या विचारांना जागे करून ते सारे आपल्या अंमलाखाली वागवावयाचे हेच प्रचंड कार्य आज आपणापुढे आहे. असें झाले तरच आपली आजची गुलामगिरी जाऊन आपले गेलेलें धनीपण आपणास पुन्हा प्राप्त होईल. काळीज, हृदय वगैरे अंतर्गत इंद्रियांच्या ज्या क्रिया आज आपणास नकळत चालू आहेत त्यांजवरही आपला अंमल

चालू होईल आणि आपण म्हणूं त्याप्रमाणे हा सारा इंद्रियगण वागू लागेल.