पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.] अभ्यास. १२७


दुसरी जड अथवा स्थूल अवस्था; पण या प्रत्ययांतही एक गंमत लक्ष्यांत घेण्यासारखी आहे. आकाश आणि प्राण अथवा शक्ति आणि जड पदार्थ यांचे वेगवेगळे प्रत्यय आपणास कधीच येत नाहीत. आपल्या साऱ्या सिद्धांतांचें मूळ असेच असतें. कसल्याही सिद्धांताच्या सांखळीच्या अखेरच्या दुव्याला आपण पोहोंचलों म्हणजे तेथें परस्परविरोधी पदार्थ सांपडतात. शक्ति म्हणजे काय ? तर जड पदार्थाला जी चालन देते ती; आणि जड पदार्थ म्हणजे काय ? तर शक्तीच्या क्रियेनें ज्याची हालचाल होते तो. अखेरीस अशा चक्राकार परिभ्रमणांत आपण सांपडतो. अनेक शास्त्रे निर्माण झाली, ज्ञानाची वाढ कोणीकडच्या कोणीकडे झाली, अशी घमेंड आपणांस वाटत असते; तथापि बुद्धिवादाच्या अखेरीस पुष्कळ वेळां मोठ्या विचित्र वस्तू आढळून येत असतात. मस्तकालाच ठावठिकाण नसतां मस्तक दुखतें असें आपण त्रिवार बजावून सांगत सुटतो. यालाच आम्ही माया म्हणतो. जेथे अस्तित्व आहे असे सांगवत नाहीं अथवा नाही असेंही निश्चयाने म्हणवत नाहीं, ती माया. जी अनिर्वचनीय स्वरूप ती माया. अशा अस्तित्वाला अस्तित्व ही संज्ञा लावता येत नाहीं; कारण काल आणि देश यांच्यापलीकडे उपाधिरहित असलेलें अस्तित्व मात्र सत्यरूप आहे. तथापि असे असतांही या जगांतील आपल्या अस्तित्वाचा अनुभव आपणास येतो. मग अशा स्थितीत तें नाहीं असें तरी कसे म्हणावें ? यावरून, आपलें चालू अस्तित्व सत्य- रूप नसून ते भासमान होणारे अस्तित्व मात्र आहे असे सिद्ध होते.
 पण चालू अस्तित्व मायारूप असले तरी प्रत्येक वस्तूला चिरंतन अस्तित्व आहे, हेही खोटें नाही. हेच चिरंतन आणि सत्यरूप अस्तित्व, देश, काल आणि कारण यांच्या जाळ्यांत सांपडून केवळ भासमान आणि असत्य झाले आहे. खरे अस्तित्व अनंत, अनादि आणि सदैव आनंदरूप असे आहे. तें उपाधिरहित आणि सदामुक्त असे आहे. मनुष्याचे हे अपार रूप देश, काल आणि कारण या उपाधित्रयाने बद्ध होऊन सांप्रतचे मानवी जीवित बनले आहे. हीच गोष्ट जगांतील प्रत्येक वस्तूस लागू आहे. प्रत्येक वस्तूच्या पोटी तेंच अपार रूप आहे. या साऱ्या शिळोप्याच्या गप्पा आहेत असे समजू नका. हे नुसतें कल्पनामय साम्राज्य नाही. या जगाला अस्तित्वच नाही असें आम्ही म्हणत नाही; पण त्याचे अस्तित्व सापेक्ष असून ज्या हेतूस्तव