पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

ण्याचा यत्न तो करतो. आपण कायद्याच्या बाहेरचे आहों-स्वतंत्र आहों-हें सिद्ध करण्याचा यत्न तो करतो, आणि त्याच्या याच भावनेंत त्याच्या ईश्वरत्वाचे बीज आहे. भविष्यत्काली केव्हांना केव्हां तो ईश्वरस्वरूप होणार आहे आणि या त्याच्या भावी दशेचे पूर्वचिन्ह त्याच्या सध्याच्या स्थितीतही अशा स्वरूपाने व्यक्त होते.
 अशा प्रकारचे स्वातंत्र्यनिदर्शन आपणांस सर्वत्र आढळून येते. सर्व धर्मातही याच स्वातंत्र्याचे दिग्दर्शन परमेश्वराच्या रूपाने केलेले असते. ईश्वर अथवा अनेक देव यांच्या स्वरूपाचे वर्णन प्रत्येक धर्माने आपापल्यापरी केलेले आढळते. या वर्णनाचा निष्कर्ष पाहिला तर सृष्टीच्या कायद्याच्या बाहेरचा प्राणी तो परमेश्वर असें म्हणण्याचाच असतो असें आपणास आढळून येते. तथापि हे सारें वर्णन विश्वबाह्य ईश्वराचे असते हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. परमेश्वर हा या सृष्टीच्या बाहेरचा कोणी तरी प्राणी असावा असा ज्यांचा समज आहे त्यांजकरतां हे वर्णन आहे. आपण म्हणजे शुद्ध क:पदार्थ आहों आणि आपण मुक्तावस्थेला कधीही पोहोचणार नाही असा मानवी बुद्धीचा निश्चय होऊन अशा स्थितीतला प्राणी सृष्टीच्या बाहेर ती शोधूं लागली. अशा प्रकारचे मुक्तावस्थेतले प्राणी अनेक असावे असा तिचा समज झाला. अशा रीतीने अनेक धर्मांची उत्पत्ति झाली. अखेरीस अनेक देवांची कल्पना नाहीशी होऊन तिच्या जागी सर्वांच्या देवाधिदेवाची कल्पना रूढ झाली; पण एवढया कल्पनेनेही मानवी बुद्धीचे समाधान होईना. ती आणखी पुढे जाऊन शोध करू लागली. सत्याच्या अधिक जवळ ती येत चालली; आणि अखेरीस या देवाधिदेवाशी आपला काही तरी प्रत्यक्ष संबंध असावा असे तिला वाटू लागले. आपण बद्ध आणि दुर्बल असलों तरी मुक्त आणि परमसामर्थ्यवान् परमेश्वराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण निगडित झालेले आहों असें मनुष्याला वाटू लागले. त्याची दृष्टि अधिकाधिक विस्तृत होत चालली. त्याच्या विचाराचे क्षेत्रही विस्तृत होत चालले आणि त्याचे ज्ञान वाहू लागले, आणि अखेरीस या सर्व देवदेवतांच्या आणि देवाधिदेवाच्या कल्पना म्हणजे स्वतःच्या स्वरूपाच्या कल्पना आहेत असें त्याच्या निदर्शनास आले. 'परमेश्वराने स्वतःच्या स्वरूपाबरहुकूम मनुष्यप्राणी घडविला' हे वचन खरे आहे, इतकेच नव्हे तर