पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ नवम


वली असे घडल्याचे एकही उदाहरण अस्तित्वात नाही. बाहेरून दुसऱ्या एखाद्या संस्कृत मानवकुलाच्या आगमनावांचून जिची संस्कृति सिद्ध झाली अशी एकही शाखा कोठे अस्तित्वात नाही. यावरून एखाद्या दुसऱ्या मानव- कुलाकडेच सुधारणेचा मक्ता होता असे मानणे ओघास येते. या संस्कृत कुलाच्या शाखोपशाखांचा विस्तार जगभर झाला आणि अशा रीतीने या सुधारणेच्या वृक्षाची वाढ झाली असली पाहिजे असे मानण्यावांचून गत्यंतर नाही.
या विषयाचा विचार व्यवहाराच्या दृष्टीने करण्याकरितां अर्वाचीन शा- स्त्रांची भाषा आपण आतां बोलूं. पण येथेही एक सूचना तुम्हांस देणे इष्ट आहे. धार्मिक बाबतींत ज्याप्रमाणे आपली बुद्धि पूर्वग्रहांनी दूषित झाली असल्याचे पुष्कळ वेळां आढळून येते, त्याचप्रमाणे अर्वाचीन भौतिक शा स्त्रांच्या अचूकपणाबद्दल आपल्या मनांत फाजील विश्वास भरला आहे. जुने धार्मिक लोक ज्याप्रमाणे आपल्या धर्मग्रंथांतील वचनाचे ग्रहण आंधळे- पणाने करतात, त्याचप्रमाणे अर्वाचीन सुशिक्षित भौतिकशास्त्रांच्या वचनां- पुढे निमूटपणे मान वांकवितात. ज्याप्रमाणे धर्मोपाध्याय आपले काम आपल्या खास हक्काचे असे समजून करीत असतात, त्याचप्रमाणे पुष्कळ अर्वाचीन विद्वानही आधिभौतिक शास्त्रांचे उपाध्ये वनले आहेत; आणि या उपाध्यांनी आपणांस काहीही सांगितले तरी आपण डोळे झाकून त्यांचे म्हणणे कबूल करीत असतो. डार्विन, हक्स्ले इत्यादिकांचे नुसतें नांव कानी पडतांच आपल्या बुद्धीचे डोळे मिटत असतात. असे करणे हीच सध्याची 'फ्याशन' आहे. ज्याला आपण सशास्त्र ज्ञान अशी संज्ञा लावीत असतो, त्या ज्ञानाच्या एकंदर पुंजीपैकी नव्याणव हिसे गोष्टी नुसत्या उपपत्ती आहेत. त्यांत सत्याचा अंश कितपत आहे या गोष्टीचा निर्णय अद्यापिही झालेला नाही. यांतील कित्येक उपपत्ती तर जुन्या भुताटकीच्या गोष्टींहून अधिक योग्य- तेच्या नाहीत. जुन्या काळी ज्याप्रमाणे भुतांना पुष्कळ डोकी आणि हात होते, त्याचप्रमाणे या उपपत्तींना पुष्कळ शिंगें फुटलेली असतात. याकरितां उगीच मोठ्या नावाखाली फसून जाण्याचे कारण आपणास नाही. खरा शास्त्रीय मार्ग म्हटला म्हणजे आपली बुद्धि शाबूत आणि डोळस ठेवणे हाच होय. 'अखंड सावधान असावें' हेच आपणास हितप्रद आहे. ज्याप्रमाणे