पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

करच रसातळास जाणार अशा अर्थाचे प्रतिपादन या ग्रंथकाराने केले होते.इंग्रज मजुरापेक्षा जर्मन मजूर कमी पैशाने मिळतो असे या ग्रंथकाराचे म्हणणे होते. या लेखाने बरीच गडवड उडविली होती. सरकारने पंच नेमून या प्रकरणाची चौकशी केली तेव्हां जर्मन मजूर एकंदरीने अधिक कमाई करतो असे निदर्शनास आले. याचे कारण हेच की जर्मन मजूर अधिक शिकलेला असतो. शूद्रांना शिक्षण दिले की जग बुडेल असें ठासून सांगणारे बुढ्ढे ज्योतिषी आमच्या हिंदुस्थानांत जागोजाग आहेत. खालच्या वर्गाला अज्ञानधिकारांत ठेवण्याचा विडाच जणूं काय या लोकांनी उचललेला आहे; आणि हेच लोक स्वतःस ज्ञानवृक्षाचा मोहोर म्हणवीत असतात! ज्ञानरूपी विषाचा गुण असा काही विलक्षण आहे की वरिष्ठ वर्गाला तें मुळीच इजा करीत नाही, आणि खालच्या वर्गाला मात्र त्याची बाधा होते असेंच जणूं काय त्यांचे मत आहे ! असो; पण हे विषयांतर बाजूस ठेवून आपल्या प्रस्तुत विषयाकडे आपण वळू.
 सूक्ष्मेंद्रिय शास्त्रांतील प्रमेयें प्रत्यक्ष व्यवहार्य आहेत की नाहीत हे आपणास पाहावयाचे आहे. हा विषय आमच्या हिंदुस्थानाला काही नवा नाही. सूक्ष्मेद्रिय शास्त्राचा अभ्यास फार प्राचीनकाळीही तेथे चालू होता. ख्रिस्त जन्माला येण्याच्या आधी सुमारे १४०० वर्षे भगवान् पतंजलि या नांवाचे एक तत्त्वदर्शी मुनि तेथे होऊन गेले. सूक्ष्मेंद्रियशास्त्राने व प्राचीनकाळच्या प्रत्यक्ष अनुभवाने लागलेले सारे शोध त्यांनी एकत्र केले. जग जन्माला येऊन दोन तीन हजार वर्षे झाली हा बायबलांतील उत्पत्तिप्रकरणांतील शोध अक्षरशः चुकीचा आहे हे प्रथम ध्यानात ठेवा. जग अत्यंत जुनाट आहे. नवा करार जन्मास आला तेव्हां, म्हणजे सुमारे १८०० वर्षांपूर्वी समाजघटनेस सुरवात झाली असे मत पाश्चात्य देशांत प्रचलित आहे. नव्या करारापूर्वी जगांत सारी मनुष्ये रानटी होती असें पाश्चात्य लोकांस वाटते. पाश्चात्य देशांपुरतें मात्र हे म्हणणे खरे असेल; पण साऱ्या जगाला अनुलक्षून असलें विधान करणे वेडेपणाचे आहे. एके वेळी लंडनमध्ये माझी व्याख्याने सुरू असतां एक बुद्धिमान तरुण गृहस्थ माझ्याशी वादविवाद करीत असे. एके दिवशी असाच वाद करतां करतांबुद्धिवादाची आपली सारी पुंजी संपली असें पाहून तो मला म्हणाला, "पण कांहो, तुमचे ते ऋषी आमच्या इंग्लंडांत कां