पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ .[नवम

याचाही विचार प्रथम अवश्य केला पाहिजे. एखादा मनुष्य चांगला नाही असें मी म्हणत असतो तेव्हां तो चांगुलपणाच्या माझ्या व्याख्येच्या कसोटीस उतरत नाही इतकाच अर्थ ध्यानात घेतला पाहिजे. ज्या गोष्टी मला करता येत नाहीत त्या त्याला किती तरी चांगल्या रीतीने करतां येत असतील; आणि या दृष्टीने तो मजहून किती तरी अधिक चांगला असेल.

 आतां आणखीही एखादें उदाहरण घेऊ. स्त्री आणि पुरुष यांच्यांतील गुणावगुणांबद्दल कोठेही वाद निघाला तरी त्यांतील पूर्वोत्तरपक्ष एकच चूक नेहमी करीत असतात. पुरुष युद्ध करू शकतात आणि भयंकर शारीरिक श्रमांची कामेही ते करतात हे दाखवून, या गोष्टी स्त्रिया करूं शकत नाहीत म्हणून त्या कमी प्रतीच्या आहेत असें एक पक्ष प्रतिपादन करीत असतो. पण असे करणे सर्वथा अन्याय्य आहे. पुरुषापेक्षा स्त्रीच्या ठिकाणी धैर्य कमी असतें असें नाहीं; पण त्याच्या स्पष्टत्वाची दिशा वेगळी असते. या जगांत जो तो आपापल्यापरी चांगलाच आहे. लहान मुलाची जोपासना करतांना जी शांति, जी सहनशक्ति आणि जें प्रेम स्त्री दाखविते ते किती पुरुषांच्या ठिकाणी तुम्हांस आढळेल ? पुरुषांच्या ठिकाणी कार्य करण्यास लागणाऱ्या धैर्याची वाढ झाली आहे, तर स्त्रीच्या ठिकाणी सहनशीलतेस लागणारे धैर्य आहे. स्त्रीच्या ठिकाणी कर्तृत्वशीलतेस लागणारा जोम नाही, तर पुरुषाच्या ठिकाणी दीर्घ सहनशीलतेस लागणारें धैर्य नाही. विश्वाच्या रचनेत सर्वत्र कांटेतोलपणा आढळतो. या कांटेतोलपणाने हे सारे विश्व इतके व्यापलें आहे की आपलें माणुसपण कायम राखण्याच्या कार्यात एखाद्या क्षुद्र किड्याचाही उपयोग होतो असें उद्या कोणी म्हणूं लागला तर तें खोटें असें आपणास छातीवर हात ठेवून सांगता येणार नाही. मी कदाचित् एक मोठा सत्पुरुष असेन, आणि दुसरा एखादा दुर्जन असेल; पण त्या अत्यंत दुर्गुणी मनुष्याच्याही अंगी एखादा सगुण असा असेल की जो माझ्या ठिकाणी स्वप्नांतसुद्धा आढळावयाचा नाही. या गोष्टीचा प्रत्यय रोजच्यारोज मला येत असतो. एखाद्या रानवट मनुष्याकडे पहा. त्याच्या शरिराची ती गोटी पाहिली की माझ्या या क्षुद देहाची लाज मला वाटू लागते. त्याच्यासारखें पिळदार शरीर मला असते तर किती बरे झाले असते असे माझ्या मनांत आल्यावांचून राहत नाही. त्याच्या मर्जीस येईल तें आणि वाटेल तितकें तो