पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] एक उघडे रहस्य. ७

विसर त्याला केव्हांच पडला नाही आणि तीसाठी चालणारी त्याची धडपडही केव्हांच थांबली नाही. मनुष्यमात्राला मुक्तीची स्थिति कशी प्रप्त होईल हे शोधून काढण्यासाठीच साऱ्या धर्माचा अवतार आहे. कित्येक धर्मांना ही गोष्ट ठाऊक नसेल अथवा दुसऱ्या कित्येकांत ती स्पष्टपणे नमूद केली असेल; तें कसेंही असले तरी साऱ्या धर्मांचा अवतार यासाठीच आहे एवढी गोष्ट मात्र खरी. प्रत्येक धर्माच्या पोटी मूळ कल्पना हीच. अगदी कनिष्ठ प्रतीचा मनुष्य घेतला तरी त्याची धडपड या विश्वशक्तीवर सत्ता चालविणारी वस्तु शोधून काढण्याकरितां सुरू आहे असें आपणास आढळून येईल. मनुष्य कितीही अज्ञ असो; प्रकृतीच्या कायद्यावर प्रभुत्व कोणाचें आहे हे शोधण्यासाठी खटपट केल्यावांचून तो राहणार नाही. या विश्वाच्या कायद्यांना वांकवील असा कोणी तरी वेताळ, समंध, पिशाच्च अथवा देव त्याला हवा असतो. ज्याच्यावर या कायद्याचा अंमल चालत नाही आणि या कायद्यापुढे जो आपली मान वांकवीत नाही असा कोणी तरी सोम्यागोम्या त्याला हवा असतो. ' या भेसूर कायद्याचा चक्काचूर उडवील असा मायेचा पूत कोणीच नाही काय ?' अशी ओरड मनुष्यजातीने जगाच्या आरंभापासून चालविली आहे. असा कायदे तुडविणारा प्राणी शोधून काढण्यासाठी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आपण धडपडत असतो. आगगाडीचे इंजन आपल्या लोखंडी रस्त्यावरून झपाट्याने धांव घेत आहे. रुळावर एक लहानसा किडा बसला आहे. इतक्यांत इंजन जवळ येतांच तो किडा सरपटून बाजूला जातो. हा देखावा पाहिल्याबरोबर आपल्या मनांत पहिली गोष्ट ही येते की इंजन मोठे शक्तिवान् झाले तरी ती मृत वस्तु; आणि तो किडा क्षुद्र असला तरी तो सजीव प्राणी आहे. विश्वाचा कायदा मोडण्यासाठी धडपड करावी ही जाणीव त्या इंजनाच्या ठिकाणी नाही आणि ती त्या किड्याच्या ठिकाणी आहे. हा फरक आपल्या मनांत आल्यावांचून राहत नाही. इंजन केवढेही शक्तिशाली असले तरी कायदा मोडण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही. मनुष्याच्या इच्छेस अनुसरून धांवावें इतकाच त्याच्या उत्पत्तीचा हेतु आहे आणि हा हेतु बाजूस ठेवून स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागावें हें सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही. उलट पक्षी तो किडा कितीही बलहीन आणि क्षुद्र असला तरी सृष्टीच्या कायद्याचे उल्लंघन करून आपणावरील संकट निवार-