पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

धरतात, आणि अखेरीस तो हात जागच्याजागी वाळून झाडाच्या एखाद्या खांदीसारखा होतो. अशा प्रकारचे शेंकडों लोक मी पाहिले आहेत. हे लोक निवळ टोणपे असतात असे समजण्याचे मात्र कारण नाही. यांतील कित्येकांचे ज्ञान इतकें खोल आणि बुद्धि इतकी विस्तृत असते की त्यांचे थोडेसें भाषण ऐकून तुम्ही तोंडात बोटच घालाल. ऐहिक शहाणपणाचा हक्क जसा तुमचा आहे तसाच पारलौकिक बाबींवर आमचा आहे. संसारांत जसे तुम्ही व्यवहारी, तसेच परमार्थांत आम्ही व्यवहारी आहो. परमार्थ हाच आमचा संसार. व्यवहार हा शब्द सापेक्ष आहे. केवळ संसारी मनुष्यच व्यवहारी असतो असे नाही. अंगीकृत कार्य सिद्धीस नेण्यासाठी एकसारखी धडपड जो करतो त्या बाबींतला तो व्यवहारनिपुण होय. मग ती बाब संसाराची असो अगर परमार्थाची असो.

 परक्या मनुष्याच्या वागणुकीचा विचार करतांना ही चूक आपण नेहमी करीत असतो. स्वतःच्या मनाबरहुकूम दुसऱ्यांच्या कृतींचें परीक्षण आपण करीत असतो. आपल्या मनाने उत्पन्न केलेल्या लहानशा उंबरफळाला सारे विश्व मानून त्यावरून साऱ्या विश्वाचें परीक्षण आपण करीत असतो. आपण निर्माण केलेल्या विश्वाबाहेर जणूं काय दुसरे अस्तित्वच नाही असें आपणास वाटत असते. आम्ही ह्मणूं ती नीति, आम्ही म्हणूं तें सत्कार्य, आम्ही म्हणूं तें कर्तव्य, आम्ही म्हणू ती वस्तु उपयोगी अथवा निरुपयोगी असें आपणास नित्य वाटत असते. युरोपच्या प्रवासांत असतां एके दिवशी मार्सेल येथे माझा मुक्काम पडला. गांवांत त्या दिवशी बैलांच्या टकरी व्हावयाच्या होत्या, ही बातमी ऐकून माझ्या बोटींतला प्रत्येक इंग्रज फ्रेंचांवर कडक टीका करीत सुटला. बैलांच्या टकरी लावणे हे त्यांना शुद्ध रानटीपणाचे लक्षण वाटले; आणि हेच इंग्रज लोक गुद्दागुद्दीचा खेळ स्वतः खेळून एकमेकांचे डोळे सुजवीत असतात. असले काही इंग्रज पहिलवान पॅरिस येथे गेले असतां फ्रेंचांनी त्यांना शेणमार केला. बक्षिसाच्या लालुचीने एकमेकांचे डोळे सुजवावयाचे हा खेळ फ्रेंचांना रानटीपणाचा वाटतो. निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या चाली अस्तित्वात असतात, आणि त्यांवरून परस्पर परस्परांस नांवें ठेवीत असतात. कोणावरही टीका करू नये अशा अर्थाचें में खिस्ताचे वचन आहे त्याची आठवण या प्रसंगी मला होते. आपले ज्ञान जो जों वाढत जातें तों