पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

तथापि त्याच वेळी आपण भिन्न नाही असा सूक्ष्म ध्वनि आपल्या अंतरंगांत असतो. अशा प्रकारचे ऐक्य अस्तित्वात नसेल तर ज्ञानाचीही उत्पत्ति होणार नाही. मुळांत साम्य असल्याशिवाय विविधतेचा प्रत्यय अथवा ज्ञान यांपैकी कशाचीच उत्पत्ति व्हावयाची नाही. याकरिता विविधता आणि ऐक्य यांचा वास एकत्र आहे हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. चालू जीवितांत सर्वत्र समता प्रस्थापित करावी असा नीतिशास्त्राचा हेतु असेल तर तसे घडणे सर्वथा अशक्य दिसते. सर्व मनुष्यांनी सर्व दृष्टींनी एकसारखेच होणे ही गोष्ट शक्य नाही. असें व्हावे याकरितां केवढाही अट्टाहास आपण केला, तरी तसे कधीही घडावयाचे नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती अथवा " पिंडे पिंडे मतिर्भिन्ना " या ह्मणी आपल्या लक्ष्यांत असतीलच. सर्व प्रकारे सारखी अशी दोन मनुष्येसुद्धा आपणास आढळत नाहीत. कारण मनुष्यामनुष्यातील फरक जन्मसिद्ध असतो. जन्मतःच त्यांच्यांत प्रतिवैचित्र्य असते. कित्येक दुसऱ्यांपेक्षा अधिक सामर्थ्यवान् असतात . कित्येकांना काही गुण जन्मतःच प्राप्त झालेले असतात आणि तंसे गुण दुसऱ्या कित्येकांत मुळीच नसतात. कित्येक शरीराने धडधाकड असतात, तर दुसरे कित्येक जन्मापासून पाप्यांची पितरे असतात. जन्मादारभ्य असलेले हे भेद आपण कशाने नाहीसे करणार ? जगांतील जीवितसंग्राम चालविण्यासाठी ज्या शस्त्रास्त्रांनी सिद्ध होऊन या जगांत आपण अवतरतों त्यांत आरंभीच जो फरक असतो तो कशानेही नाहींसा व्हावयाचा नाहीं. वाढत्या वयाने हा फरक उलट अधिक व्यक्तदशेला मात्र येतो; पण असे आहे तरी या सर्वांच्या मागें ऐक्य आहे हेही खोटे नाही. नीतिशास्त्राचा सिद्धांत हीच गोष्ट आपल्या कानींकपाळी ओरडून नित्य सांगत आहे. आजपर्यंत होऊन गेलेल्या अनेक साधुसंतांनीही आपणास वारंवार हेच सांगितले आहे. " इहैव तैर्जितः सर्गों येषां साम्ये स्थितं मनः । निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थितः ॥ ” हाच या सर्वांचा अखेरचा सिद्धांत आहे. त्यांचा हा सिद्धांत सर्वथा खरा आहे ही गोष्ट आपणास नाकबूल करता यावयाची नाही. तथापि त्याबरोबरच आणखीही एक गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे. बाह्य आकारांत आणि सूक्ष्माच्या जड रूपांत जो फरक दिसतो तो कशानेही नाहीसा व्हावयाचा नाही. दृश्यस्थितींतील फरक दृश्यावस्थेच्या अंतापर्यंत कायम राहावयाचा आहे हे विसरतां उपयोगी नाही.