पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] हक्क. १०९

नाकबूल करून चालावयाचे नाही. कारण ती वस्तुस्थितीच आहे. जी गोष्ट खरीच आहे ती डोळ्यांआड करण्यापासून फायदा काय ? येथे विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की या वैचित्र्यांतून ऐक्य नवें निर्माण करावयाचे नसून तसें ऐक्य अगोदरच अस्तित्वात आहे. असें ऐक्य मुळांत नसते तर तुम्हांस हे वैचित्र्य-ही विविधता-दृष्टीसच पडती ना. या विविधतेची ही सारी इमारत ऐक्याच्या पायावर उभी आहे. ऐक्य हेच परमेश्वराचे स्वरूप. परमेश्वराला नवीन निर्माण करावयाचे नसून त्याचे अस्तित्व आधीच आहे हे लक्ष्यात ठेविले पाहिजे. सर्व धर्मानी हीच गोष्ट मुख्यत्वेंकरून सांगितली आहे. सान्त वस्तु ज्याला साकल्येंकरून समजली त्याला अनंतही जवळच आहे, असा प्रत्यय येईल. कित्येक धर्मानी सान्त वस्तूच्या म्हणजे बाह्य आकाराच्या बाजूवर अधिक जोर दिला आहे, आणि सारे बाह्य आकार सान्त आहेत असे त्यांचे प्रतिपादन आहे. दुसऱ्या कित्येकांनी फक्त अनंतरूपाचाच विचार करून सर्वत्र अनंतच भरला आहे आणि सान्त वस्तूला कोठे अवकाशच नाही असे सांगितले आहे. शुद्ध तर्कशास्त्रदृष्ट्या यांतील कोणतेही एकच प्रतिपादन सर्वांशी खरे नाही. ही दोन्ही स्वरूपें जोडीने राहत असून एकाच्या साहाय्यावांचून दुसऱ्याचा अनुभव होणे शक्य नाही अशी वस्तुस्थिति आहे. सर्व विविधतेच्या मुळाशी ऐक्य आहे असा अखेरचा धर्मसिद्धांत आहे. याला आपण ऐक्य म्हणा, अनंत म्हणा अथवा पूर्णरूप म्हणा. तें नवें निर्माण करावयाचे नसून त्याचे अस्तित्व आधीच आहे. अशा स्थितीत ही वस्तुस्थिति ओळखणे आणि तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणे इतकेच आपले कर्तव्य बाकी उरतें. ऐक्य आहे ही गोष्ट आपणास कदाचित् समजत नसेल, अथवा थोडी फार समजत असल्यास स्पष्ट भाषेने ती सांगावयास येत नसेल, अथवा इंद्रियांना ती प्रत्यक्ष गोचर नसेल, तथापि तें त्रिवार सत्य आहे. मुळांत असलेल्या या ऐक्याचा अनुभव घेणे, एवढेच कार्य आपणास करावयाचें उरले आहे. हे ऐक्य नवीन उत्पन्न करावयाचे नाही. शुद्ध विवेक बुद्धीच्या दृष्टीने सुद्धा मुळांतील हे ऐक्य कबूल केल्यावांचून आपणास गत्यंतर नाही. कारण मुळांत चिरस्थायी ऐक्य नसेल तर विविधताही पाहणे आपणास शक्य नाही. आपणाभोवती पसरलेल्या या विविध वस्तूंच्या देखाव्यांत भिन्नता दिसते; तुझी आणि मी असे आपण वेगवेगळे प्राणी आहो असे वाटत असते;