पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

गोष्ट इतकी उघड आणि प्रत्येकाच्या प्रत्यक्ष अनुभवांतली आहे की ती सिद्ध करण्यास कसलाही बाहेरचा पुरावा आणण्याचे कारण नाही; आणि विविधता असल्याशिवाय जीवित शक्य नाही हेही खरे आहे. त्याच प्रमाणे या विविधतेच्या मागे ऐक्य कोठे आहे हे आपणास पहावयाचे असेल तर तें कार्यही विविधतेच्या द्वारेंच आपणांस केले पाहिजे हेही खरे आहे. तसेच सृष्टीच्या द्वारे परमात्मरूपाचा प्रत्यय येतो, हे जितकें खरें आहे तितकेंच परमात्मरूपावर सृष्टीचा आविर्भाव आहे हेही खरे आहे. मनुष्य हा सृष्ट प्राणी असल्यामुळे त्याचे ज्ञान झाल्यास परमात्मरूपाचे ज्ञान होईल हे खरें आहे, आणि परमात्मरूपाचे ज्ञान हे अत्युच्च कोटीचे ज्ञान आहे हेही खरे आहे. परमात्मरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय मनुष्यरूपाचे ज्ञानही साकल्ये करून होणार नाही. अशा रीतीने या साऱ्या वस्तुसंघांत परस्परविरोध असल्याचा प्रत्यय येत असला तरी मानवी मनाची रचना या विरोधाभासावरच अवलंबून आहे. विश्वाचा हा सारा देखावा म्हणजे एकानेंच अनेक सोंगें घेऊन अनेक रूपे दाखवावी तसें आहे. एकतानतेवर अनेक रूपाच्या तरंगांचा हा खेळ आहे. ऐक्य आणि विविधता यांच्यांत जो खेळ सुरू आहे त्याचेच नांव विश्व. सान्त आणि अनंत यांच्यांतील जो झगडा त्याचेच नांव विश्व. यांपैकी कोणा एकाचे अस्तित्व मानावयाचे असेल तर त्याबरोबर दुसऱ्याचे अस्तित्व मानणेही अवश्य आहे. तथापि एकाच वस्तूला अस्तित्व आणि नास्तित्व अशी दोन रूपे असून दोन्हीही खरी आहेत असे मात्र नव्हे; पण असें असतांही या विश्वाचे चक्र अशाच विरोधी स्वरूपांत आणि झगड्यांत चालावयाचें आहे, हा अखेरचा महत्त्वाचा मुद्दा सदोदित लक्ष्यांत बाळगला पाहिजे.

 आजच्या प्रसंगी आपणास नीतिशास्त्राचा विचार कर्तव्य नसून धर्मविचार हे आपलें प्रथम कर्तव्य असल्यामुळे या प्रश्नाचा विचार आपणास त्या दिशेने केला पाहिजे, ज्या स्थितीत कसलेही वैचित्र्य नाही आणि जेथे सर्वत्र एकतानता आहे अशी स्थिति म्हटली म्हणजे मृत्यूचीच होय. अशा स्थितीत जीवित शक्य नाही. जेथें विचारवैचित्र्य नाहीं तेथें विचाराला स्फूर्ति तरी कोठून असणार ? आणि स्फूर्तीच्या अभावीं विचार जिवंत तरी कसे राहणार ? याकरितां जीवित आहे तोपर्यंत विविधता म्हणजे वैचित्र्य हे असणारच. हे वैचित्र्य नाहीसे होणे इष्ट नाही. तथापि या वैचित्र्यामागें ऐक्य आहे हे