पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] हक्क १०७

लावल्यावांचून ही प्रवृत्ति स्वस्थ बसत नाही. जगाच्या या संसाराचे पृथक्करण अशाच रीतीने करता करता सर्व विविधतेच्या अंतर्यामी ऐक्य आहे असा निश्चय हिंदु शास्त्रांनी केला. विश्वाचा मूळ पाया ऐक्य आहे असा निश्चय एकवार झाल्यावर पुढील साऱ्या इमारतीची रचना याच पायावर त्यांनी केली. तथापि त्याच हिंदुस्थान देशांत बौद्धादि विविधतावादी पंथ निर्माण झाले हे लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. या पंथांना ऐक्य म्हणून कोठे आढळलेच नाही. विविधता हेच त्यांच्या दृष्टीने सत्य रूप होते. विविधता आणि ऐक्य यांच्यात काही परस्परसंबंध असेल असे त्यांच्या स्वप्नीही आले नाही.

 जुन्या ग्रीस देशांतील एक दंतकथा प्रो. मॅक्समुल्लर यांनी कोठल्याशा पुस्तकात सांगितली आहे तिचे स्मरण या ठिकाणी मला होतें. एके वेळी एक ब्राह्मण साक्रेटिस यास भेटण्यासाठी अथेन्स शहरी गेला होता. ब्राह्मण साक्रेटिसाला म्हणाला, “ अत्युच्च ज्ञान कोणते ? ” साक्रेटिसाने उत्तर दिले, " मनुष्याचे स्वरूप जाणणे हाच सर्व ज्ञानाचा अत्युच्च परिपाक आहे. ज्ञानाचें अखेरचे साध्य हेच. " ब्राह्मण ह्मणाला, " पण परमेश्वराला जाणल्यावांचून मनुष्याचे स्वरूप कसे जाणतां येईल? "

 अर्वाचीन युरोपीय ज्ञानाचा मूळ पाया ग्रीक तत्त्वज्ञान हाच आहे. यामुळे अर्वाचीन युरोपीय तत्त्वज्ञानाचा सारा रोख मनुष्याचे स्वरूप जाणण्याकडे आहे. मनुष्याचे स्वरूप जाणण्यांतच साऱ्या ज्ञानाची परिसमाप्ति होते असें युरोपीय मत आहे. हिंदु तत्त्वज्ञान याहून निराळ्या दिशेने गेले आहे. परमेश्वराच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान प्रथम झाले पाहिजे असें हिंदु तत्त्वज्ञानाचे म्हणणे असून जगांतले बहुतेक जुने धर्म याच मताचा अनुवाद करतात. परमेश्वराचा वास सृष्टीत आहे असें एक पक्ष पाहतो आणि सृष्टीचा वास परमेश्वराच्या ठिकाणी आहे असे दुसऱ्याच्या दृष्टीला दिसते. या दोन्ही पक्षांना मध्यस्थ अशा स्वरूपाने आपण सांप्रत उभे आहों. या दोहोंपैकी कोणत्याही एकाच ग्रहाने आपणास पछाडलेले नाही. यामुळे दोहोंत मध्यस्थ राहून निर्विकार चित्ताने यांचें परीक्षण करणे आपणांस शक्य आहे. दोहोंचेंही बलाबल पाहून योग्य निर्णय करण्यास जी पूर्वग्रहशून्यता पाहिजे ती सांप्रतकाळी आपणाजवळ आहे असे मला वाटते. सृष्टींत विविधता आहे ही