पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

रितां अशी एकतानता वंद्य नसून निंद्य आणि त्याज्य आहे. ही विचारपरंपरा सांगणारा पक्ष सर्व देशांत आणि सर्व काली अस्तित्वात होता आणि आजही तो सर्वत्र अस्तित्वात आहे. निरनिराळ्या देशांत अस्तित्वात असलेल्या या पक्षांत कोठे भेद असेल तर तो भाषेचा मात्र आहे. देशकालानुरूप हेच तत्त्व अनेक भाषांनी प्रकट होत असते. हा पक्ष या तत्त्वाचा उच्चार पुनःपुन्हां मोठ्या जोराने करीत असतो आणि असें करण्यांत जातीची उच्चनीचता समाजांत कायम राहीसे करावें हाच उद्देश त्याला साधावयाचा असतो. ज्या वेळी एखाद्या जातीचे वर्चस्व कायम राखावयाचे असेल त्या वेळी या तत्त्वाचा उच्चार हा पक्ष फार जोराने करीत असतो. आमच्या हिंदुस्थानांतील ब्राह्मण हीच उपपत्ति आपल्या सामाजिक हक्कांच्या रक्षणासाठी पुढे आणीत असतात. जातिभेद नष्ट झाला तर समाजही नष्ट होईल असे ते म्हणतात. हिंदुसमाजाइतका प्राचीन समाज आज कोठेही अस्तित्वात नाही, ही गोष्ट इतिहाससिद्ध आहे; आणि हिंदुसमाज इतक्या स्थित्यंतरांतून वांचला याचे कारण जातिभेद आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अशा रीतीने ऐतिहासिक पुराव्याचा उपयोग करावयास सांपडल्यामुळे त्यांच्या या मताला सकृद्दर्शनी तरी मोठे महत्त्व प्राप्त होते. दीर्घ आयुष्य जीमुळे प्राप्त होते अशी वस्तु व्यक्तीला अथवा समाजाला अत्यंत इष्ट अशीच गणली पाहिजे असें अधिकारयुक्त वाणीने ते सांगत असतात, आणि हे त्यांचे म्हणणे खोडून काढणे मुष्किलीचे आहे असें सकृदर्शनी तरी मनांत आल्यावांचून राहत नाही.

 जगाचे अस्तित्व ऐक्यावर नसून भेदावर अवलंबून आहे असे म्हणणारा पक्ष ज्याप्रमाणे आरंभापासून अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे ' सर्वं खल्विदं ब्रह्म' असें म्हणणारा पक्षही त्याच काळापासून अस्तित्वात आहे. उपनिषद्ग्रंथ, बुद्ध, त्रिस्त इत्यादिकांच्या कालापासून तो थेट चालू क्षणापर्यंत या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो. देशकालपरिस्थित्यनुरूप या पक्षाच्या भाषेत फरक पडत असला तरी मूलतत्व तेंच आहे हे लक्ष्यांत आणले पाहिजे. गरिबांचा कैवारी सोशालिस्ट पक्ष, ज्यांना समाजांत कसलाच हक्क नाही अशा खालच्या वर्गाचे पुढारीपण स्वीकारणारा पक्ष, वगैरे साऱ्या मतांचे प्रचारक हे तत्त्वतः या ऐक्यपक्षाचेच लोक होत. अमुक मनुष्य कमी का अथवा अमुका दुसरा अधिक का, असा प्रश्न हे लोक विचारतात तेव्हां या