पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

एका राजाच्या पदी शेकडों सरदार आणि दरकदार होते. महाराजांच्या ठिकाणी आपली अत्यंत भक्ति आहे असे प्रत्येकजण म्हणे. राजासाठी आपण प्राणही देण्यास तयार आहो असें प्रत्येकजण भासवीत असे. आपल्या इतका अनन्यसेवक महाराजांस दुसरा कोणीही मिळावयाचा नाही असे प्रत्येकजण राजाला सांगे. कालांतराने एके दिवशी एक संन्यासी राजदरबारी आला. त्याच्याशी कांहीं संभाषण चालू असतां राजा संन्याशाला म्हणाला, “ जिवाला जीव देणारे इतके सरदार दुसऱ्या कोणाही राजाच्या पदरी नसतील. " संन्यासी हसून म्हणाला," राजा तुझ्या भाषणांत सत्य किती आहे हे कोणी सांगावें? " राजाने उत्तर दिले, “ आपली मर्जी असेल तर आपण यांची प्रत्यक्ष परीक्षाच पहा. ” राजाचे म्हणणे कबूल करून त्या संन्याशाने एक मोठा यज्ञ आरंभिला. या यज्ञाची सांगता झाली म्हणजे राजाचे राज्य सर्व पृथ्वीवर पसरेल असें त्या यज्ञाचें फळ त्याने सांगितले, आणि सांगतेकरिता एक मोठा हौद बांधवून राजाच्या पदरच्या सर्व सरदारांनी त्यांत रात्रीच्या वेळी दुधाच्या घागरी ओताव्या असें फर्मान राजाकडून काढविले. राजा हसून म्हणाला, " महाराज, हीच का तुमची परीक्षा? यांत नापसंत कोणीच उरणार नाही. " सर्व सरदारांनीही ताबडतोब माना डोलवून मोठा आनंद व्यक्त केला. रात्र पडून अगदी काळोख झाला तेव्हां साऱ्या सरदारांनी आपापल्या घागरी आणून त्या हौदांत ओतल्या. सकाळी पाहतात तो तो हौद नुसत्या पाण्याने मात्र भरला आहे असे आढळून आले. राजाच्या सर्व सरदारांपैकी प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार केला की, इतक्या दुधांत माझी एक घागर पाण्याची असली तरी ती कशी ओळखू येणार ? या विचाराने प्रत्येकाने पाण्याची घागर त्या हौदांत ओतली होती. आपणांपैकी प्रत्येकाची स्थिति आज याच प्रकारची आहे. तत्त्व चांगले असले तरी त्याचा आचार सुरू करण्याची जबाबदारी आपण लोकांवर टाकीत असतो. मी एकट्यानेच त्याच्याविरुद्ध वर्तणूक केल्याने समाजाचे नुकसान कितपतसें होणार, असा विचार प्रत्येकाच्या मनांत येतो. यामुळे आपल्या वाट्यांस जी कांही सामाजिक कामें येत असतात त्यांची वाट आपण या सरदारांप्रमाणेच लावीत असतो.
 सर्व मनुष्ये एकाच ईश्वराची लेकरें असल्यामुळे परस्परांत बंधुत्वाचे नाते आहे ही गोष्ट अगदी उघड असल्यामुळे ती साऱ्याच्या प्रत्ययाचीच आहे