पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदांत व हक्क. ९७

असें तो समजत असतो. तो म्हणतो, “ ही माणसें कशी मूर्ख आहेत पहा ! या जगांत कार्य तें काय करावयाचें ? बोलून चालून हे जग म्हणजे मायेचा खेळ, आणि तुम्ही काहीही केले तरी अखेरपर्यंत तें मायाच. त्याच्यांत बदल होणे त्रिकालांतही शक्य नाही. मग ही सारी धडपड तरी कशाला? " " वेदान्तमतावर तुझा विश्वास आहे काय ? " असा प्रश्न हिंदुस्थानांतल्या एखाद्या धर्मगुरूला केला तर “ होय' असें निश्चयात्मक उत्तर तो ताबडतोब देईल. तो म्हणेल, " हा तर माझा धर्मच आहे. मग त्यावर माझा विश्वास आहे की नाही हा प्रश्नसुद्धां उद्भवण्याचे कारण नाही. वेदान्त हा माझा धर्म, आणि धर्म म्हणजे माझा जीव. " यावर त्याला कोणी म्हटले की " सर्वत्र समता आहे हे तत्त्व तुला मान्य आहे काय ?" तर त्यावर तो ' होय ' असेंच उत्तर देईल. पण इतक्यांत एखादा महार अथवा मांग त्याच्याजवळ येऊ या की ताबडतोब दहा हात उडी तो मारील. महाराचा स्पर्शसुद्धा त्याला सहन होणार नाही. " तूं उडी का मारलीस " असा प्रश्न त्याला कोणी केला तर तो म्हणेल, " त्याच्या स्पर्शाने मला विटाळ झाला असता. " अरे, पण तूं आतांच समदर्शित्वाच्या गोष्टी सांगत नव्हतास काय? मग इतक्यांतच तें कोठें गेलें ?" तो म्हणेल, " अहो, ही नुसती उपपत्ति आहे. गृहस्थाश्रमी माणसाला तिचा उपयोग करून चालावयाचे नाही. मी अरण्यांत गेलों म्हणजे सर्वत्र समदृष्टीने पाहीन." तुमच्या या इंग्लंडांत झाले तरी हाच प्रकार आढळतो. ख्रिस्ताचे अनुयायी या दृष्टीने मनुष्यांतील परस्पर बंधुत्वाचे नाते आणि समता ही तुम्हांसही मान्य आहेत. सर्व माणसें एकाच ईश्वराची लेंकरें हे तत्त्व तुमच्यांतील एखादा श्रीमंत सरदार सहज कबूल करील; पण पुरीं पांचही मिनिटे गेलीं न गेली तोच खालच्या वर्गाबद्दल अत्यंत धिक्काराचे उद्गार काढण्यास तो मागेपुढे पाहणार नाही. हाच अनुभव जगांतील सर्व देशांत येतो. अशा रीतीने सर्वत्र समतेचे हे तत्त्व आज हजारों वर्षे ग्रंथांतरी मात्र अस्तित्वांत राहिले आहे. पण त्याच्या प्रत्यक्ष आचाराबद्दल म्हणाल तर तो मात्र कोठेही. आढळून येत नाही. तें सर्वांच्या बुद्धीला पटते. तें ऐकून सर्वजण माना डोलवितात. हे नितांत सत्य आहे असेंही सर्व म्हणतात; पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष वागून दाखवा असें तुम्ही म्हटले की तें व्यवहारांत रूढ होण्यास लक्षावधि वर्षे पाहिजेत हे उत्तर ठेवलेलेंच.

स्वा०वि०९-७