पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत. ९५

गोष्टी आज आपणास दुःखप्रद वाटत आहेत त्यांचे कांहींच महत्व आपणांस वाटावयाचे नाही. या गोष्टींनी आपणास पूर्वी तरी दुःख का झाले असें मनांत येऊन तुमचें तुम्हांलाच हंसू येईल. याच साम्यावस्थेला मुक्ति असें नांव वेदान्ताने दिले आहे. या साम्यावस्थेच्या अधिकाधिक जवळ जाणे हीच मुक्तीची वाट चालत असण्याची खूण होय.
 " सुखदुःखे सभे कृत्वा लाभालाभौ जयाजयो " अशी वागणूक ज्याच्या ठिकाणी प्रत्यही दिसत असेल त्याचे मन साम्यावस्थेच्या जवळ जवळ जात आहे असे समजावें. मन जिंकणे हे कर्म सोपे आहे असे कोणीही समजू नये. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट पाहून समुद्राच्या लाटेप्रमाणे ज्याचें मन उचंबळतें, यत्किंचित् विरोध होतांच ज्याचें मन क्रोधानें भडकतें अथवा एखाद्या काल्पनिक भीतीनेही ज्याच्या मनाची गाळण उडते त्याच्या मानसिक अवस्थेला नांव तरी कोणतें द्यावें। वायूच्या लहानशा लहरीबरोबर वादळांत सांपडल्यासारखें ज्याचें मन भयंकर हेलकावे खाऊं लागते, त्या बिचाऱ्याची स्थिति खरोखर मोठी अनुकंपनीय आहे! अशा दुबळ्याने मोठेपणाच्या गोष्टीसुद्धा बोलू नये. असा मनुष्य धर्मसाधन कोणत्या मार्गाने करणार ? ज्याला चैतन्यसागरांत स्नान करावयाचे असेल त्याने असली दुबळी मनःस्थिति टाकून देण्यासाठी धडपड केली पाहिजे. आपल्या मनाची सारी दिशाच त्याने बदलली पाहिजे. बाह्य जगाचे आघात सोसण्याची तयारी आपल्यापाशी कितपत आहे याचा विचार ज्याचा त्याने करावा. आपल्या मनःस्थितीचा आढावा प्रत्यही आपल्यापाशीच काढावा. आपलें सामर्थ्य प्रत्यहीं अजमावीत जावें. स्वसुखासाठी बाह्य जगाच्या तोंडाकडे पाहावें नलागतां आपलें मन आपल्याशींच कितपत रममाण होऊ शकते याची चालना प्रत्यही आपल्या चित्तांत करावी. लहान मुलाला स्वतःच्या पायांनी चालतां येत नसले म्हणजे त्याला पांगुळगाडा देत असतात. आपली स्थितिही याच प्रकारची आहे. आपले मन इतकें पंगु आहे की बाह्य उपाधिरूप पांगुळगाड्याच्या आधारावांचून एक पाऊल टाकणेसुद्धा त्याच्या जिवावर येते. आता त्याला त्याच्याच पायावर उभे राहण्यास शिकविले पाहिजे. त्याच्या पायांत कितपत जोम येत आहे हे नेहमी पाहत जा. बाह्य जगाने ढकलून दिले तरी कोलमंडून न पडतां आपल्याच पायावर त्याला स्थिरा-