पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
टिळकांचे अंतरंग

 पण आमच्या ह्याहि संसारांत गमतींना कांहीं तोटा नव्हता. एक दिवस रात्रीचे आम्ही जेवायला बसलों असतां कांहीं तरी जळाल्याची घाण येऊ लागली. बाहेरच्या खोलीत सायकलचा दिवा पेटलेलाच पुस्तकाच्या कपा- टावर ठेवला होता. तो भडकून मोठा जाळ झाला होता. आम्ही सर्व धाऊन गेलो. त्याच दिवशी दत्तू आला होता. मी म्हणे दिव्यावर राख टाका. ते म्हणत नाही पाणी टाका. ह्या वादांत बराच वेळ गेला. तिकडे भडका अधिकच होऊ लागला. ते मोठमोठ्याने ओरडू लागले ही जिथे तिथे माझा असा पाणउतारा करते, इतक्यांत दत्तूनें काठीने दिवा खाली पाडला व वर राख टाकली.
"दत्तू तूं जिथे तिथे माझा अपमान करतोस. तुला माझी किंमत कळली नाही."
“मला किंमत कळली आहे पण ही वेळ किंमतीची नाही. वारा सुटला आहे. पाण्याने आणखी भडका होईल."
" होऊ दे. तुला काय त्याचें ? घर माझें जळेल, मी मालक आहे !"
 पण राख टाकतांच दिवा विझला होता. टिळकांचा रागहि शान्त झाला होता. ते आपल्या ऑफिसमध्ये गेले व थोड्या वेळाने एक कविता घेऊन बाहेर आले. टिळकांना आपले दोष कळू लागले होते व ते घालविण्याचा ते अटोकाट प्रयत्न करीत. ही कविता म्हणजे त्यांचे पिळवटून निघालेले हृदयच आहे.-

तोवरि संताप, संताप

जोंवरि पदरी पाप-धृ०
अभिमानें आकळिलें
जोंवरि क्रोधपिशाचे पिळिलें-१
हार फुलांचा दिसशी
अवाचित साप भयंकर होशी-२
ज्ञानतरंगी तरशी
गरगर मोहावती फिरशी-३

ख्रिस्ताला वश आतां