विहीर खणून झाली. टिळकांना व आम्हा सर्वांना फार आनंद वाटला. आतां
विहीर बांधायची ! तेथे एक वडारी होता. त्याने पांचशे रुपये घेऊन ती
बांधून देण्याचे कबूल केले. दरमहा त्याला पन्नास रुपये द्यायचे. टिळकांना
ट्रॅक्ट सोसायटीचा शंभर रुपये पगार होता. त्यांतून पन्नास रुपये गेले.
खाली राहिलेल्या पन्नास रुपयांत वावीस रुपये चाकरानोकरांना जात.
उरलेल्या अठ्ठावीस रुपयांत दत्तूला दहा रुपये पाठवावे लागत. अठरांत
आम्हाला संसार करायाचा होता. आमच्या घरी चार नोकर होते व
पांचवा राखणदार भिल होता. भिलाला ठेवायालाच पाहिजे. तो जरी
हजर नसला तरी चाले. त्याचा पगार चालू झाला, की आमची हजेरी
घेण्यास चोर कधी येत नसत.
ह्याच गडबडीत दोन पत्रे आली. एक हौशीचें व दुसरें सुगंधराव करमर-
करांचं. हौशीला बाळंतपणासाठी यायचे होते! हे तिचे पहिले बाळंतपण !
सुगंधराव करमरकर हवा बदलण्यासाठी येतो म्हणत होते !
टिळकांचा स्वभाव असा होता, की ते कधी कोणाला नाही म्हणायचे
नाहीत ! आग्रहहि करायचे नाहीत. कोणी येतो म्हटले तर ते या म्हणायचे,
जातों म्हटले तर जा म्हणायाचे. त्यांनी दोघांना या म्हणून पत्रे पाठविली.
माणसें आली. हौशी, हौशीचा नवरा, तिची सासू; सुगंधराय करमरकर,
त्यांचे कुटुंब व चार मुलें; माटेगांवकर, टिळक व मी अशी बारा माणसे
आम्ही झालों व एवढ्यांचे एकोणीस रुपयांत करायाचें ! शेतांत कांदे बटाटे,
पुदीना, कोथिंबीर, टमाटू, हिरवी मिरची हा माल आम्हाला पुरेल इतका
भरपूर होता. तसेंच घरच्या गाईचे दूध, तूप, लोणी ताक हीहि भरपूर
होती. विहिरीचे गोड पाणी व सर्व मंडळीचे गोड स्वभाव ह्यामुळे कधी
कोणी कंटाळले नाही. बाजरी, ज्वारी जे असेल तें सारे आनंदाने खात.
विडीकाडी, तेल, मीठ, चहा, साखर, घासलेट, काड्याच्या पेट्या वगैरे
सामानाखेरीज बाजारांतून त्या दहा महिन्यांत दुसरें सामान आणावें लागले नाही.
पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१: टिळकांचे अंतरंग