पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७
त्याची कल्पना टिळकांची

 ख्रिस्ती नागरीक व १९१२ ते १९१९ चे ज्ञानोदयाचे अंक चाळून पाहिले तर त्यांतून पुष्कळ आश्चर्ये दिसून येतील.
 जळगांवांस पहिले कवि संमेलन भरले. त्याची कल्पना मूळ टिळकांच्या डोक्यांतील असली पाहिजे हे १६ फे. १९०७ च्या ख्रिस्ती नागरिकाच्या अंकावरून दिसून येते. ह्या संमेलनाचा मूळ हेतूहि ह्या अंकांतील पत्रांत दिसून येईल. तें पत्र असें:-

वि. वि. ईश्वराच्या कृपेने जळगांव येथे मार्च ता. २ व ३

असे दोन दिवस आधुनिक मराठी कवींचे संमेलन व्हावे असें ठरले आहे. हिंदुस्तानच्या इतिहासांत कवि आणि कविता यांची जागा, त्या जागेवरून आमचे आजचे कवि ढळले आहेत का, ढळले असतील तर त्यांना पुन्हां त्या पदावर आरूढ होतां येईल एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतलेच असे एखादें मराठी महाकाव्य का नाही, असे एखादें काव्य होणार नाही का, काव्यरत्नावलीसारखें आधुनिक कवितेचे मासिक पुस्तक सोळा सतरा वर्षे अस्तित्वांत असून इतकें विपन्नावस्थेत कां आहे, आधु- निक कवितेला ब्रिटिश सरकाराकडून व एतद्देशीय संस्थानिकां- कडून प्रत्यक्ष आश्रय मिळणे शक्य आहे का, शेवटी आधुनिक कवींचेंच एखादें कार्यकारी मंडळ स्थापन झाले, तर त्यापासून कांहीं प्रत्यक्ष फायदा होण्यासारखा आहे का, इत्यादि महत्वाच्या प्रश्नांचा खल होऊन निकाल लागावा, व हे होत असतां मधून मधून सकल कवींनी वाग्देवीपुढे बसून परस्परांस रंगवावे, प्रोत्साहित करावें, स्नेहरज्जूंनी आपलेसे करून घ्यावे इत्यादि हेतूंनी हे संमेलन भरविण्यात येत आहे; तरी आपणांकडून व आपल्या वाचकांकडून या कार्यास योग्य प्रोत्साहन मिळेल,

अशी आशा आहे.