पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४ : जळगांवचे कविसंमेलन

 भास्करराव कोटक हे टिळकांचे मोठे दोस्त होते. टिळकांचे ते मोठे चहाते होते. ख्रिस्ती समाजांत आल्यावर येथील पुढाऱ्यांना टिळक पुष्कळ दिवस पचले नाहीत. पुष्कळ बाबतींत कानामागून आला न् तिखट झाला अशी त्यांच्याबद्दल ह्या पुढाऱ्यांची भावना होत असे. आणि टिळकहि ह्या "पुढाऱ्यांना” पुरून उरणारे होते. त्यांच्यावर टिळकांनी कांहीं कांहीं कविता केल्या आहेत, त्यांत मोठी खोंच आहे. एका गृहस्थांनी टिळकांच्या विरुद्ध पुष्कळ खोट्यानाट्या गोष्टी सांगून लोकमत दूषित करण्याचा विडाच उचलला होता. त्यांना अनुलक्षून टिळकांनी आपली " टिमकी- वाला" ही कविता लिहिली. शेवटली ओळ "जाळ वार्तेला की जाळ अशा तोंडाला" इतकी संतापून लिहिली आहे की, शेवटी शेवटी ही कविता आपण उगीच लिहिली म्हणून त्यांना वाईट वाटे) दुसरी एक कविता, "तो आम्हाला भ्याला" म्हणून अशाच टीकाकारांवर लिहिली होती. तींत चंद्र उगवला आहे, तो हंसत हंसत रात्रभर आपले मार्गक्रमण करीत आहे. शेवटी प्रभाती सृष्टीनियमाप्रमाणे तो मावळतो, परंतु रात्रभर कुत्र्यांनी ऊर फुटेपर्यंत भुंकून भुंकून जिवाचा आटापिटा केला व सकाळी चंद्र आम्हाला भिऊन पळाला म्हणून समाधान मानून घेतले अशा आश- याची ही कविता आहे. आणखी एक कविता “दानीएल आणि ग्रामासंह" म्हणून आहे. बायबलमध्ये ही गोष्ट आहे. दानीएल हा एक मोठा ईब्री भगवद्भक्त होऊन गेला. त्याच्या छळवाद्यांनी त्याला सिंहाच्या गुहेत नेऊन टाकले पण तेथें सिंहाने त्याला काही केले नाही अशी ही कथा आहे. टिळकांच्या ह्या कवितेत ग्रामसिंहांना त्यांनी म्हटले आहे की, “ सिंहा- च्याही गुहमधे जो निर्भय हो राहुन । तयावर अर्थ काय भुंकुनी ॥"
 असो. कोटकांना मराठी कविता फार समजे व विशेषतः वर सांगितल्या तसल्या त-हेच्या कविता ते मिटक्या मारून वाचीत व आपल्या समाजां- तील अहंमन्य पुढाऱ्यांना टिळकच वठणीला आणतील अशी त्यांची प्रामा- णिक समजूत होती. ते एक विभूतिपूजक होते. पण त्याच वेळी ते टिळ- कांचे मित्रहि होते.