पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११
क प भ र ए रं ड्या सो ल

झाले. प्रत्येक गोष्टींचा कांहीं तरी उपयोग झालाच पाहिजे! तसे तेथे सर्व कांहीं स्वतः करायचे व सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा हे माझें चालले होते. त्यांत अगदी माझ्याच वृत्तीचा चिमबाबा मला मिळाला होता आम्ही दोघांनी मोटांचे नाडे, सैंदर वगैरे जिन्नस मुलांच्या गाद्यांचा दानर्धम करून उरलेल्या काथ्याचे बनविले होते. औषधे वगैरेहि तयार करण्याचा नाद मला होताच. मडकेंभर एरंज्या पाहून त्यांचा सदुपयोग करून घेण्याचे माझ्या डोक्यात आले. मी चिमबाबाला म्हटले,चिमबाबा एक कपभर एरंड्या सोल बघू. त्याने त्या सोलल्यावर त्या बारीक वाटून त्यांत दालचिनी व सुंठ घातली व गायीच्या तुपांत त्या भाजल्या. मग साखरेचा पाक करून एरंड्याची बर्फी बनविली! ती फारच छान लागत होती. एखादा जिन्नस एकटीने खायाचे माझ्याच्याने कधीच होत नाही. पण ही बर्फी तयार होईपर्यंत सारी माणसें झोपी गेली होती. दत्तू तेवढा जागा होता. दत्तूनें थोडा भुगा खाल्ला. मीहि उरलेल्या भुग्याचा चट्टामट्टा केला. बेबी घेईना. तिला फक्त झोप येत होती. मग आम्ही निजलों.
 पहांटें दत्तूला अभ्यासाला उठवून बसविले. पण तो कांहीं बसेना माझी सरबत्ती सुरू झाली. " तूं कधी अभ्यास करीत नाहीस. पुढे भोक मागा- यची का? चांदकर नेहमी म्हणतात तूं कधी अभ्यास करीत नाहीस."
दत्तू म्हणाला " आई मी खरंच सांगतो. माझं डोकं फिरतं आहे."  "अभ्यासाच्याच वेळेला कसं तुझं नेहमीं डोकं फिरत असते." माझं हे बोलणे ऐकून तो जुलमाने उठून बसला तो धपकन खाली पडला. मी त्याला उठवायला गेले तर मलाहि सारे फिरते आहे असे वाटूं लागले. आणि मग आमच्या दोघांच्या हालाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आमची कॉलरा झालेल्या माणसासारखी स्थिति झाली. चिमबाबा घाबरला. तो टिळकांना तार करूं म्हणत होता. शेवटी मी त्याला डॉ. बालैंटाईनकडे पाठविले. चिमबाबाने डॉ. बालैंटाईन- साहेबांना सर्व प्रकार सांगितला, साहेब फार रागावले. ते म्हणाले-
 " अरे बाबा ! ती बाई फार वाईट आहे. ती नेहमी असेंच भलतें सलतें करून खाते. नवऱ्याला देते. मुलाला देते. मला पाठविते. नवऱ्याचे डोळे

तिनेच असें त्याला कांहीं कांहीं खायला घालून बिघडून टाकले.”