पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/८०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नंबर दिला होता. त्या नंबरवर फोन लावल्यावर त्याला साताऱ्यात बोलावून घेण्यात आलं होतं. एसटी स्टैंडच्या मागं. पारंगे हॉस्पिटल चौकात. तिथून बायकोला संबंधित लोक एका गाडीतून सोनोग्राफीसाठी घेऊन गेले होते. पण सोनोग्राफी कुठं झाली, हे मात्र आपल्याला माहीत नाही, असा जबाब त्यानं दिलेला. “सोनोग्राफीनंतर दोन दिवसांनी गर्भपात करण्यासाठी मात्र मीच माझ्या ओळखीनं तिला अकलूजला घेऊन गेलो होतो, असा त्याचा जबाब होता.

 पोलिसांच्या मदतीनं आम्ही रामसिंगचे त्या काळातले कॉल डिटेल्स मिळवले. दोघांचं स्टेटमेन्ट जवळजवळ सारखंच येणार, असं वाटलं होतं. पण त्याच्या बायकोची एन्ट्री झाल्यावर कहाणीला वेगळीच कलाटणी मिळाली. "तू शिकलेली आहेस का? या प्रश्नानं मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. पण ती केवळ शिकलेलीच नव्हे, तर मला ओळखणारी निघाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत महिलांना नोकरी मिळायला हवी, या मागणीसाठी आम्ही पूर्वी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला ती आली होती. पारंगे हॉस्पिटल चौकात तिला गाडीत बसवून नेण्यात आलं, इथंपर्यंतचा तपशील बरोबर होता. "तुला कुठं नेलं हे दाखवू शकशील का? दवाखाना दाखवशील का? या प्रश्नाला तिनं होकारार्थी उत्तर दिलं आणि आम्ही तिला गाडीत बसवलं. पोवई नाक्यावरून तिनं गाडी हायवेच्या दिशेनं नेली. गाडी हायवेला लागल्यावर आम्हाला शंका आली... काशीळचा बोगस डॉक्टर खान! तोच असावा. व्हेटर्नरी डॉक्टर जे मशीन गाई-म्हशींची सोनोग्राफी करायला वापरतात, त्या मशीननं बायकांची सोनोग्राफी करणारा! 'दवाखाना असा बोर्ड लावलाय. त्याचा भाऊ डॉक्टर आहे; पण खान स्वतः मात्र डॉक्टर नाही. आधीही अशा प्रकरणात तो सापडला होता. रामसिंगच्या बायकोनं काशीळचा तोच दवाखाना दाखवला.

 ही बाब एवढ्यात उघड करायची नाही. तिला काशीळच्या खानकडे ज्या डॉक्टरनं पाठवलं, त्यालाही पकडायचं आणि त्यासाठी स्टिंग ऑपरेशन करायचं, असं आम्ही ठरवलं. परत येताना हायवेवरच्या ढाब्यावर आम्ही सगळे जेवलो. रामसिंगच्या बायकोला तब्येत सांभाळण्याच्य सूचना दिल्या. सकाळी आल्याबरोबर तिनं निम्मीच कहाणी सांगितली होती आणि आम्ही

७६