Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बरीच हेरगिरी केली होती. फौजी बायकोला ज्या गाडीतून घेऊन गेला, त्या पांढऱ्या आल्टोचा नंबरसुद्धा त्यानं आम्हाला पुरवला होता. वेताळ साहेबांनी भेटायला बोलावल्यावर आम्ही सगळे संध्याकाळी वाईला गेलो. गाडीनंबर बघून ते म्हणाले, इथली लोकलच दिसतीय गाडी. त्यांनी आरटीओ ऑफिसला फोन लावून गाडी कुणाच्या नावावर आहे, हे काढून घेतलं. गाडीमालकाला बोलवून घेतलं. तो रामसिंगचा मित्रच. मग त्याला पाठवून रामसिंगला बोलावून घेतलं. प्रश्नोत्तरं सुरू झाली; पण ठोस माहिती मिळेना. उडवाउडवीचीच उत्तरं.

 अशा वेळी तोंडं कशी उघडायची, हे तंत्र आतापर्यंत मला चांगलंच अवगत झालं होतं. “मला पाच मिनिटांचा वेळ द्या, असं मी वेताळ साहेबांना खुणावताच रामसिंगला एकट्याला तिथं ठेवून बाकी सगळे बाहेर गेले. मी रामसिंगला म्हटलं, “हे बघ. सरळ बोललास तर ठीक आहे. तुला सुरक्षित कसं ठेवायचं, हे आम्ही बघू; पण त्यासाठी तू खरं बोललं पाहिजे. थोड्या प्रयत्नांनंतर तो बोलू लागला. बायकोला घेऊन गेल्याचं कबूल केलं. वेताळ साहेबांकडून साडेसात-आठच्या दरम्यान रामसिंगला आमच्या ताब्यात घेतलं. सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलला येईपर्यंत वाटेत त्याचं प्रबोधन केलं. 'चुकीचं काही बोललास तर तू नक्की अडकशील, हे समजावून सांगितलं. सिव्हिल सर्जनच्या केबिनमध्ये गेल्यावर त्याला जसं आठवेल तसं खरं-खरं लिहून काढायला सांगितलं. बोलतानासुद्धा तो मधून-मधून वेगळीच माहिती देतोय, काहीतरी लपवतोय, विसंगत बोलतोय, हे ध्यानात येत होतं. लिहिताना तसं होणार नाही, असं वाटलं होतं. पहाटे पाचपर्यंत त्याचं स्टेटमेन्ट लिहून घेणं चाललं होतं. सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे.

 बायको कुठाय, असं विचारल्यावर ती माहेरी गेल्याचं त्यानं सांगितलं. त्याला म्हटलं, “घरी जा. तुझ्या दोन्ही मुलींची कुठेतरी सोय लाव. सासुरवाडीला जा आणि बायकोला घेऊन ये. त्याची सासुरवाडी खंडाळा तालुक्यातल्या शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत. नीरा नदीजवळ. तो बोलत असताना कैलासनं शूटिंग करून ठेवलं होतं. लेखी स्टेटमेन्टबरोबरच बाइटसुद्धा आमच्याकडे जमा झाली होती. पण त्याच्या बोलण्यातली विसंगती मात्र गुंतागुंत वाढवणारी होती. रामसिंगच्या सांगण्यानुसार, त्याला एका मित्रानं

७५